मंगळवार, २२ जुलै, २००८

ढाकचा बहिरी - एक अनुभव. प्रेषक धमाल मुलगा ( शुक्र, 05/23/2008 - 16:04) .


राम राम मंडळी !वरच्या फोटूतला गड हा ढाकचा बहिरी आहे हे बर्‍याच जाणकारांनी ओळखलं असेलच।तर हा ढाक-बहिरी कित्येक दिवस आम्हाला खुणावत होता. दुरुनच वाकुल्या दाखवत होता. शेवटी एकदाचा योग जुळुन आला.तर त्या अनुभवाचे हे शब्दरुपांतर. मला ठाऊक आहे, हा अनुभव केवळ अनुभवण्याचा आहे, वाचुन फार काही हाती लागणार नाही, पण तरीही खास आपल्या माणसांसाठी मला हे लिहावंस वाटतय, म्हणून हा लेखनप्रपंच.
सन २००३। आम्ही त्याकाळी विद्यार्थीदशेत होतो. कॉलेजात छान ग्रुप जमला होता. असंच एकदा, ढाक-बहिरीचा विषय निघाला, म्हणलं, "च्यायला, बर्‍याच जणांकडून फार ऐकून आहे यार, हा ट्रेक जबरा आहे म्हणून. पण सालं जाणं काही होत नाहीय्ये."बस्स...आमचे मित्र म्हणजे आमच्यासारखेच. माकडाच्या हाती कोलित पडल्यावर गाव पेटायला किती वेळ लागतोय? तिथंच बसल्याबसल्या "ह्या शनिवारी आपण 'ढाक' ला चाललो आहोत. कोणि कलटी दिली तर त्याच्यावर कोर्टमार्शल होईल" असा फतवा निघाला.
जाणारे आम्ही ५ जण। मी (के.डी.), अमोल (अमल्या), संतोष (संत्या), कमलेश (कम्मो / कमळी) आणि परमजीतसिंग (पॅरी/सरदार).मी, अमल्या आणि सरदार तिघं माथेफिरु, तर संत्या एकदम साजुक तुपातला. तसा तब्येतीनं एकदम पहिलवान पण लेकाचा टिपीकल पांढरपेश्या. 'क्यालक्युलेटेड रिस्क' हे त्याचं आवडतं वचन. कम्मोची तर वेगळीच कथा...हा मारवाडी, वडिलांची निवृत्ती ६ महिने - वर्षावर आलेली. घरात थोरला, पाठीवर दोन बहिणी, त्यांच्या लग्नाची जबाबदारी ह्याच्यावर॥आणि काळीज एकदम सशाचं. कसा काय आम्हा टारगटांमध्ये आला हा कोण जाणे. असो.
जायचं ठरलं तर खरं, पण कुठुन कसे जायचे कोणाला माहिती? मग माहितीची जुळवाजुळव करण्यात दोन दिवस गेले। शेवटी एकदाची माहिती मिळाली. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येण्यासारखा ट्रेक आहे असं कळलं. मग कोणि काय शिधा आणायचा हे ठरवलं. त्याप्रमाणे सगळ्यांनी एकदम झकास तयारी केली. होता होता शनिवार उजाडला.
भल्या पहाटे ७ वाजता उठून आवरुन कोथरुडहून अमोलच्या घरी सदाशिव पेठेत पोहोचलो, तर साहेब अजुन लोळत पडले होते। काकूंना विचारलं, "ह्यानं तुम्हाला काही सांगितलं नाही का आजच्या ट्रेकचं?" तर काकू म्हणाल्या, "मी त्याला जागं करुन दमले, आता तूच बघ." काकूंना म्हणलं, "असं उठवतात का त्याला? हे बघा॥" आणि काचकन त्याच्या कंबरड्यात लाथ घातली, पुढच्या २० मिनिटांत साहेब सॅक पाठीला लावून माझ्यासोबत शिवाजीनगर स्टेशनच्या रस्त्याला लागले होते मी आणि अमोल शि.न. स्टेशनवरुन तर कम्मो आधीच पुणे स्टेशनहुन लोणावळा लोकल पकडणार होतो, संत्या आणि सरदार चिंचवडातून लोकलमध्ये चढणार होते. शि.न.स्टेशनवर लोकलमध्ये चढताना कम्मो कोणत्या डब्यात चढला आहे ह्याचा गोंधळ उडाला आणि आम्ही दुसर्‍याच डब्यात चढलो. चिंचवड स्टेशनला एकमेकांची चुकामुक, हाकांचा सपाटा इ.इ. जोरदार प्रकार होऊन शेवटी आम्ही एकत्र बसलो.
आम्हाला तळेगाव स्टेशनावर उतरायचं होतं त्यामुळे आम्ही निवांत बसलेलो होतो। रिवाजाप्रमाणे चेष्टामस्करी चालू होतीच. आकुर्डीला बरीच गर्दी कमी झाली....झालं॥आमच्या टारगटपणाला मोकळं रान मिळालं. अमल्या एक नंबरचा निर्लज्ज...डब्यात "शिरडीवाले साईबाबा..." करुन सगळीकडं फिरुन आला...येताना चक्क सात- साडेसात रुपये कमावले भिकार्‍यासारखे
लोकल तळेगाव स्टेशनात आल्याबरोबर आम्ही फटाफट उड्या टाकल्या आणि पुढची गाडी पकडण्यासाठी बस स्टॅन्डकडे धूम ठोकली। स्टॅन्डवर पोचल्यावर कळालं की जांबोलीला जाणारी बस केव्हांच निघून गेलीय. पुढची बस कधी आहे हे बघावं म्हणलं तर उत्तर मिळालं संध्याकाळी सहा वाजता! बोंबला !!! आत्ताकुठे सकाळचे १०:३० - १०:४५ वाजत होते. तोंडं पाडून आम्ही स्टॅन्डबाहेर आलो...वेळ कसा घालवावा ह्याचा विचार करता करता २ डझन केळी विकत घेतली. एकेक केळ खाऊन होतं ना होतं तोच "जांबोली...जांबोली" असा ओरडा ऐकू आला. पाहिलं तर एक जीपवाला 'सीटा' भरत होता.म्हणलं चला, काहीतरी सोय झाली. आधी लेकाच्यानं अव्वाच्या सव्वा भाडं सांगितलं, पण कम्मो बरोबर असल्यानं मस्त घासाघिस होऊन शेवटी ५० रु. प्रत्येकी ठरलं. जशी ती जीप तळेगावातून बाहेर पडली, तशी तिनं आम्हाला शरिरात कुठं कुठं हाडं असतात, आणि त्यातली कुठली हाडं शेकली की माणूस जास्त कळवळतो ह्याचं मौलिक ज्ञान द्यायला सुरुवात केली. आख्खा रस्ता खाचखळग्यांनी भरलेला. त्यात भर म्हणून जीपमध्ये १२-१४ जण कोंबलेले॥आम्ही आपले सॅक्स सावरत, एकमेकांच्या तंगड्यांत तंगड्या अडकलेल्या, आणि हेंदकळणार्‍या जीपमध्ये स्वतःचा कसाबसा जीव मुठीत धरुन बसलो. मजल दरमजल करत एकदाची ती जीप जांबोलीला पोचली...हुश्श्य!!!
जांबोली गावातून...गाव कसलं, २०-२५ घरांची वस्तीच ती,एक मोठा पार, तिथंच बस थांबते मुक्कामाला। तर तिथुन ढाकचा बहिरी ट्रेक सुरु होतो. जांबोलीत पोचेपावतो छान टळटळीत दुपार झाली होती. उन मी म्हणत होतं. पारासमोरच्या घरातच आम्ही आपापल्या सॅक्स टाकल्या. त्यांना पैसे देऊन मस्त लिंबूसरबत प्यायलो. वर जाऊन परत यायला किती वेळ लागतो ते विचारुन घेतलं. त्यांनी सांगितलं, "लय न्हाई पावनं, ३ एक घंट्यात याल की परत" म्हणलं चला, सॅक्स इथंच ठेऊ. परत आल्यावर खिचडी करुन खाऊ.कारण ओढ लागली होती ती डोंगरमाथ्यावर जायची.जरुरीपुरतं सामान (पाण्याच्या बाटल्या, केळी, ग्लुकोज बिस्किटं, बॅटर्‍या, सुरे-कुकर्‍या, कांदा, कम्मोने आणलेल्या दुधी-भोपळ्याच्या गोड पुर्‍या इ.इ.) काही सॅक्समध्ये घेऊन आम्ही चढाईला निघालो.....
-------------------------------------------------------------------------------
पुढचा भाग लवकरच...
शक्यतो आजच देण्याचा प्रयत्न आहे। मंडळी राग न धरावा.
(लेखातील फोटो आंतरजालावरुन साभार। मुळ फोटो कालौघात गहाळ झाल्याकारणे हा मार्ग अनुसरावा लागला.)
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.