मंगळवार, २२ जुलै, २००८

ढाकचा बहिरी - एक अनुभव (भाग २) प्रेषक धमाल मुलगा ( शुक्र, 05/23/2008 - 18:34) .

...कारण ओढ लागली होती ती डोंगरमाथ्यावर जायची।जरुरीपुरतं सामान (पाण्याच्या बाटल्या, केळी, ग्लुकोज बिस्किटं, बॅटर्‍या, सुरे-कुकर्‍या, कांदा, कम्मोने आणलेल्या दुधी-भोपळ्याच्या गोड पुर्‍या इ।इ.) काही सॅक्समध्ये घेऊन आम्ही चढाईला निघालो.....
जांबोलीच्या पारापासून निघालेला रस्ता सरळ जंगलाकडे जातो। त्याच रस्त्याने चालत पुढे निघालं की श्री कोंडेश्वर मंदीर लागते। ह्या मंदीरापासून पुढे खरा ट्रेक चालू होतो.
कोंडेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या वाटचालीला सुरुवात केली। मंदीरापासून साधारणतः अर्धा एक कि.मी. चालल्यावर एक उजवीकडे जाणारे वळण येते. ह्या वळणापासून जंगल सुरु होतं. जसं हे वळण पार केलं तसा आमच्या उत्साहाचा धबधबा जोरात कोसळायला लागला. वरुन उन्हाचा तडाखा चालू होताच, पण फिकीर कोणाला होती? आम्ही पाच मस्तमौला आमच्याच मस्तीत चाललो होतो. कुठे फोटोच काढ, गाणीच म्हण असा दंगा घालत पुढे पुढे जात होतो. वाटेत एक कुंड लागलं, झालं...अचानक सगळ्यांना फारच उन असल्याची जाणिव व्हायला लागली. मग काय, पटापट कपडे काढून धडाधड उड्या मारल्या कुंडात. मस्त खेळलो पाण्यात अर्धा तास. तोपर्यंत कम्मो बसला आमचे कपडे सांभाळत काठावर.पोहुन झाल्यावर वेळेचं भान आलं, मग इमाने इतबारे चढाई करायचं ठरलं. जसं जसं जंगल दाट व्हायला लागलं तसं उन्हाचा कडाका जाणवेनासा झाला. आम्ही सगळे मजेत चाललो होतो, आणि संत्या एकदम शिस्तीत झाडांच्या बुंध्यांवर, मोठ्या दगडांवर खडूनं खुणा करत येत होता. एक नंबरचं पर्फेक्शनीस्ट लेकाचं. आमच्या टाळक्यात आलं नसतं हे.
वाटेत थांबून केळी खा, सिगारेटी फुंक असा सुखनैव प्रवास चालू होता। चढाईच्या डाव्या हाताला दरी ठेऊन पायवाट नागमोडी वळणं घेत झाडा-झुड्पात लपलेली होती. भन्नाट रानवारा आम्हा खोंडांच्या कानात शिरुन आम्ही नुसते उधळलो होतो.मजल दरमजल करत कसेबसे निम्मंशिम्मं जंगल पार केलं असेल नसेल, तेव्हढ्यात अचानक वरुणदेवाला काय हुक्की आली कोण जाणे. जो रपारप पाऊस कोसळायला लागला, आडोसा शोधता शोधता नाकी नऊ आले. अजुन तर ढाकची घळही नजरेच्या टप्प्यात आली नव्हती, बहिरीचा कडा लांबचीच गोष्ट.
बराच वेळ वाट पाहिली, पण वरुणदेवाला काही दया यायची लक्षणं दिसेनात। घड्याळात पाहिलं तर काटे दुपारचे तीन वाजले आहेत असं सांगत वाकुल्या दाखवत होते. म्हणलं, "लेको तसेही आपण पुरते भिजलेलोच आहोत. आणखी काय वेगळे भिजणार आहोत? त्यापेक्षा हाही अनुभव घेऊ, मस्त पावसात पुढे निघुया."पॅरी चेकाळला॥ "हां यार, चलो चलते है। होर किन्नी देर इथ्थेही बैठे रहेंगे? चलो, छेत्ती करियो"हो नाही करता करता आम्ही पुढे निघालो. सकाळी घरातून निघताना जे काही खाल्लं होतं त्यानंतर पोटात चार-दोन केळ्यांखेरीज काहीच नव्हतं. वरुन पाऊस झोडपत होता, जोडीला रानवारा घूं..घूं.. करत चेकाळून उठला होता. अंगावर शहारे म्हणजे चांगले मोहरीएव्हढे उभे राहिले होते. आणि उपाशीपोटी आतून भुकेचा आगडोंब उसळला होता. बाहेरुन मरणाचा गारठा, आणि पोटातून आग! अस्सलं काहीतरी विचित्र समिकरण झालं होतं की बास!
शेवटी भुकेपुढे हार मानुन आम्ही एका कपारीचा आडोसा घेतला।एव्हढीश्शी कपार ती, आम्ही पाचजण...कसले मावतोय त्यात डोंबल? कसंबसं डोकं भिजणार नाही असं वेडेवाकडे बसलो तिथेच. सॅक्स उघडल्या.आमचा कम्मो लगेच मोजणीला लागला. तोवर आम्ही अर्धभिजल्या बिड्या ओढायला सुरुवात केली. तेव्हढंच जीवाला समाधान
कम्मोनं जाहीर केलं "भाईलोक्स, आपली मस्त लागलेली आहे। मी आणलेल्या पुर्‍या, ग्लुको बिस्किटांचा दिड पुडा ७-८ केळी आणि ४-५ कांदे एव्हढंच खाण्यालायक सामान आहे. आणलेला शिधा आपण खालीच गावात ठेऊन आलोय."हातातल्या बिड्या कधी गळून पडल्या हेच कळालं नाही. पण काय करता, भूक तर वेड्यासारखी लागली होती. आलीया भोगासी असावे सादर म्हणून जे आहे ते पोटात ढकलायला सुरुवात केली.म्हाराजा, कधी दुधीभोपळ्याच्या गोड पुर्‍या कच्च्या कांद्यासोबत खाल्यात का तुम्ही? आम्ही खाल्ल्या आणि
केळ्यांबरोबर बिस्किटं...
कशीबशी भूक तर भागवली। तोपर्यंत पाऊसही बराच कमी झाला होता. एकदा भूक भागल्यावर लक्षात आलं की आपले कपडे ओलेचिंब झाले आहेत, अगदी जिन्स-जर्किन पासून ते अंर्तवस्त्रांपर्यंत एकजात सगळे !!! आणि तो ओलावा आणि गारवा वाहणार्‍या रानटी वार्‍यासोबत अंगाअंगात भयानकरित्या झिरपतोय. सगळे आपले कुडकुडत पुढे निघालो. जसं चालायला लागलो तशी जरा उब मिळायला लागली. करता करता ढाकच्या घळीशी येऊन पोचलो एकदाचे. दोन्ही बाजुंनी उंच कडा आणि मधून एकदम चिंचोळा रस्ता...भरीत भर म्हणून पाऊस पडून गेलेला॥सगळं निसरडं झालेलं. ह्या घळीपर्यंत सगळा चढाचाच भाग, अन् घळीत मात्र एकदम उतार. पायातल्या बुटात अर्धा अर्धा लिटर साचलेलं पाणी, मणामणाची झालेली ओली जिन्स... पार फाफलली सगळी पोरं. जगदंबेचं नाव घेतलं आणि घळ उतरायला सुरुवात केली....पडत- धडपडत, ठेचकाळत कसेबसे घळ उतरुन आलो.
घळ संपली आणि समोर पाहिलं, जेमतेम ४-५ फुट जागा असेल-नसेल सपाटीची, पुढे भस्सकन दरी ! जे डोळे पांढरे झाले, गोट्या पार कप्पाळात...कम्मो सगळ्यात शेवटी उतरत होता, तो उतारामुळे जवळजवळ धावतच खाली आला...आम्ही सगळे ओरडून त्याला सावरायला धावलो। त्याला पकडला आणि म्हणलं, "रांडेच्या, जरा पुढे बघ॥" त्यानं ज...रा पुढे डोका सशाचं काळीज लागलं लुकलुकायला. ते बिचारं जे पाय थरथरवत मटकन खाली बसलं ते १० मिनिटं उठलंच नाही.कमळ्यानं दिलेला हा पहिला झटका..पुढे फार त्रास झाला त्याच्या ह्या भित्रेपणाचा.
घळ उतरल्यावर उजवीकडे वळून दरी पुन्हा डाव्या हाताला ठेऊन चिंचोळ्या वाटेनं आमची ही वरात पुढे निघाली। पावसामुळं उन्हाचा तडाखाच काय, पण मागमुसही उरला नव्हता. ओल्या वातावरणामुळं कपडेही वाळत नव्हते. पिसाळलेला वारा नुसता भन्नाट वाहत होता. ते झोंबरं वारं तोंडावर झेलत कसंबसं आम्ही बहिरोबाच्या कड्याखालच्या गुहांपर्यंत पोचलो. जीवात जीव आला. ह्या गुहा एकदम ऐसपैस होत्या. सगळ्यांनी बुट, कपडे सगळं उतरवलं. अंगावर लज्जारक्षणापुरत्या छाट्या तेवढ्या शिल्लक ठेवल्या. काय करता, ओल्या कपड्यांपेक्षा झोंबरं वारं उघड्या अंगावर घेतलेलं परवडत होतं.
गुहेत बसल्याबसल्या बिड्या पेटवून जरा आराम केला। इथं बरीच उब होती. १५-२० मिनिटात बरीच तरतरी आली.म्हणलं, "चला मंडळी, ४:३० वाजलेत, अजुन महत्वाचा टप्पा पार करायचाय. सॅक्स, कपडे सगळं तिथेच गुहेत ठेऊन पुढे निघालो. नाहीतरी कोण येणार होतं तिथं चोरी करायला?
ह्या गुहेपासुन पुढचा बहिरोबाच्या गुहेपर्यंतचा पल्ला खरा महत्वाचा। एक कडा साधारणतः ७०-८० अंशातला, अधेमधे काही निसर्गनिर्मित तर काही वर जाणार्‍यांनी केलेल्या खाचा, आधारापुरता एक दोर, आणि सोबतीला खालची भीषण दरी अरे.....ह्याचसाठी केला होता अट्टाहास!!!! अशी अवस्था झाली हे बघून.
मी, अमल्या आणि सरदार समोरचं आव्हान बघून चेकाळलो, तर कमळ्या परत मटकन खाली बसला। संत्याही, "येड्यांनो, कुठं वर जायचं? पावसानं सगळं निसरडं झालं असणार. रिस्क घ्यायला हरकत नाही, पण ती कॅल्क्युलेटेड पाहिजे रे॥" वगैरे बडबडायला लागला.
आम्ही दोघांचा नूर ओळखला, आणि वाद नको म्हणून म्हणालो, "संत्या, कम्मोला वर नेण्यात पॉईन्ट नाही। असं कर, तू त्याला सांभाळ, आम्ही येतोच जाऊन."
संत्यानं परत एकदा पिरपीर केली, तीच कॅसेट वाजवून पाहिली, पण रामा शिवा गोविंदा!इतकं सोसल्यानंतर, शेवटच्या क्षणी तेही लक्ष्याच्या इतक्या जवळ पोचल्यावर माघार घ्यायची आमची मुळीच तयारी नव्हती।
हर हर महादेव...............अशी सुरुवात करुन सरदारच्या वाहेगुरुंनाही आवाहन करुन आम्ही शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली। चढण मोठी कठीणच. भल्याभल्यांची दमछाक करेल अशी. आम्हीतर बिचारे नवशिके. पार तोंडातून फेस यायची वेळ आली. पण माघार घेतली तर मर्दानगी ती कसली? असं म्हणून पुढे जात राहिलो.
चुकुन खाली नजर गेली, की दरी पाहून गरगरायला व्हायचं, मग एकमेकांच्या जवळ जवळ राहून चढायला लागलो...डोळे फिरले की एकानं दुसर्‍याला आधार द्यायचा, आणि बॅलन्स करायला तिसर्‍यानं टेकू लावायचा। कधी खाचेतून हात निसटायचा, कधी पायाखालचा दगड सुटून दरीत गडगडत जायचा...मिनिटभर नुसत्या हातावर सगळा भार टाकून लोंबकळत रहावं लागायचं. लगेच घरच्या सगळ्यांचे चेहरे नजरेसमोर फिरायला लागायचे, मनोमन आईबापाची माफी मागून पुढच्या जन्मी भेटू असं मनातल्या मनात म्हणायचो.
बहिरोबाच्या झेंड्याचं दर्शन घडलं तेव्हा कुठे जीवात जीव आला। 'आता फार उरलं नाही' ह्या भावनेनेच उत्साह परत सळसळायला लागला.झपाझप वर चढून गेलो. एकदाचे बहिरोबाच्या गुहेत पोहोचलो, आणि डोळ्यातून घळाघळा पाणी वहायला लागलं. तिथेच थकून फतकल मारुन बसलो. जरा श्वास जागेवर आल्यावर बहिरोबाचं दर्शन घेतलं.
काय नजारा दिसतो देवा ह्या ठिकाणाहून....उभं मावळखोरं डोलतं नजरेपुढं। मंत्रमुग्ध होऊन वेड्यासारखे कितीवेळ पहात राहिलो कोण जाणे?
आता खाली उतरायला हवं हे लक्षात आल्यावर "आयचा घो रे! संत्याचं ऐकलं असतं तर बरं झालं असतं" असं एक पन्नास वेळा तरी म्हणून झालं असेल।
कसंबसं जीव मुठीत धरुन् उतरायला सुरुवात केली। चढणं सोपं एकवेळ, पण उतरणं? सगळ्या पितरांना मदतीसाठी खाली बोलावलं. धीर करुन मुंगीच्या पावलांनी जसे चढलो तसेच एकमेकाला आवरत सावरत एकदाचे खाली उतरलो....जीव वाचला म्हणून काय हल्लकल्लोळ केला संत्याला आणि कम्मोला मिठ्या काय मारल्या.जरा वेळ गुहेत बसलो, अर्धं अर्धं केळ खालं. आणि थोडा आराम केला.
एव्हढ्यात पॅरी जोरात ओरडला..."ओय खोतियों...उथ्थे वेख्खो...सनसेट्ट! क्माल है यार...सिंपली अमेझिंग"...............
---------------------------------------------------------------------------
क्रमशः
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.