मंगळवार, १५ जुलै, २००८

कांद्याची आमटी आलोकी सोम, ०२/०६/२००८ - १९:४०.

वाढणी:२-३ व्यक्तींसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दिड वाटी तूर डाळ,
दोन मध्यम आकाराचे कांदे,
६-७ लसूण पाकळ्या,
२ इंच लांबीचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा,
२ लहान तुकडे दालचीन
३-४ लवंगा,
लाल तिखट,
काळा (गोडा) मसाला,
गुळ
चवीपुरती आमसुले अथवा चिंचेचा कोळ,
ओले खोबरे,
कोथिंबीर,
फोडणीचे साहित्य,
मीठ,
तेल.
क्रमवार मार्गदर्शन:
तूरडाळ चवीपुरती हळद व हिंग घालून चांगली शिजवून घ्यावी. एक कांदा बारीक चिरून घ्यावा. वाटणाकरीता एक कांदा आणि सुके खोबरे गॅस वर चांगले भाजून घ्यावे. दालचिनी व लवंगा तळून घ्याव्यात. भाजलेला कांदा, भाजलेलं सुकं खोबरं, लवंग, दालचिनी, ६-७ लसूण पाकळ्या हे सारे वाटून घ्यावे. तेलाची नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यात चिरलेला कांदा घालावा. तो गुलाबीसर तळला गेल्यावर त्यात वाटण घालून जरा परतावे. मग त्यात २-३ वाट्या पाणी घालून एक उकळी आणावी. ( पाण्याचे प्रमाण तुम्हाला हव्या असलेल्या दाटपणानुसार कमी-जास्त करावे. ) मग त्यात शिजवलेली डाळ घालून चवीनुसार गुळ, मसाला, लाल तिखट, आमसुले अथवा चिंचेचा कोळ, ओलं खोबरं, मीठ घालून आमटी चांगली उकळावी. वाढताना कोथिंबीर पेरून वाढावी.
माहितीचा स्रोत:आई
अधिक टीपा:तांदळाची भाकरी, ओल्या खोबऱ्याची लसूण घालून केलेली चटणी आणि ही आमटी, मस्त बेत जमतो.