मंगळवार, १५ जुलै, २००८

चॉकलेट उंदीर वरदा गुरु, १२/०७/२००७ - २२:२२.

वाढणी:अनेक
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
हर्शी किसेस (शंकूच्या आकाराची छोटी चॉकलेटस)
चॉकलेट चिप्स - १ छोटे पाकिट, वा सूक्ष्मभट्टीमध्ये वितळवण्यायोग्य चॉकलेट
बदामाचे काप
स्ट्रॉबेरी वा चेरी जॅम/जेली
देठ असलेल्या चेरी (हवाबंद डब्यातील वा ताज्या)
बटर कागद वा प्लास्टिक कागद व लोणी/तूप
क्रमवार मार्गदर्शन:
एका ताटली मध्ये बटर कागद वा प्लास्टिकला एका बाजूने तूप/लोणी लावून ती बाजू वर येईल अशा तऱ्हेने ठेवा.
ताज्या चेरी वापरणार असाल तर धारदार सुरीने चेरीला कोनाच्या आकाराचा (<) छेद देऊन हलक्या हाताने बिया काढून टाका. हे करताना चेरीचा देठ निघणार नाही ह्याची काळजी घ्या, तसेच चेरीचे दोन भाग होणार नाहीत हेही पाहा. हवाबंद डब्यातील चेरी बिया काढूनच मिळतात. हवाबंद डब्यातील चेरी वापरणार असाल तर डब्यावर "देठासहित" लिहिले असल्याची खात्री करा. चेरींना देठ असणे आवश्यक आहे.
हवाबंद डब्यातील पाणी काढून टाकून चेरी टिश्यू कागदावर काढा. हलक्या हाताने दाब देऊन चेरी शक्य तेवढ्या कोरड्या करून घ्या. ताज्या चेरीही धुतल्यावर पुसून घ्या.
चॉकलेट चिप्स वापरणार असाल तर एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवा. एका छोट्या व हलक्या भांड्यामध्ये चॉकलेट चिप्स घालून ते भांडे गरम पाण्यात घाला. हे छोटे भांडे पाण्यावर तरंगले पाहिजे. चिप्स मध्ये पाणी जाणार नाही ह्याची काळजी घेत चमच्याने चॉकलेट वितळेपर्यंत ढवळत राहा. सूक्ष्मभट्टीमध्ये वितळवण्यायोग्य चॉकलेटच्या गोळ्याही बाजारात मिळतात. ते वापरले तर डबा/पाकिटावर लिहिलेल्या सूचनांनुसार सूक्ष्मभट्टीमध्ये चॉकलेट वितळवा.
एक एक चेरी ह्या वितळलेल्या चॉकलेटमध्ये सोडून चेरीवर सर्वत्र चॉकलेटाचा थर बसेल अशा पद्धतीने घोळवा. देठाला चॉकलेट लागले नाही तरी चालेल, लागले तरी चालेल. चेरी ताटलीतल्या बटर/प्लास्टिक कागदावर काढा. अशा सर्व चेरी चॉकलेटामध्ये घोळवा व ताटली किमान तासाभरासाठी शीतकपाटात ठेवा. त्याने चेरीवरचा चॉकलेटचा थर घट्ट होईल.
तासाभराने थोडे चॉकलेट पुन्हा वितळवा. शीतकपाटामधल्या चेरी एकावेळी ३/४ बाहेर काढा. वितळलेल्या चॉकलेटामध्ये हर्शी किसेस चा तळाचा भाग बुडवून तो चॉकलेट चेरीच्या देठाच्या विरोद्ध बाजूला चिकटवा. त्याचवेळी बदामाचे काप मध्ये कानाप्रमाणे लावा. असे सर्व चेरींना हर्शी किसेस चिकटवून बदामाच्या कापाचे कान लावून पुन्हा शीतकपाटात ठेवा.
तासाभराने हे उंदीर बाहेर काढून त्यावर डोळ्यांच्या जागी काडीच्या टोकाने जॅम/जेलीचे थेंब द्या. मेंदीच्या कोनासारखा कोन करून त्यात जॅम/जेली भरून तोही डोळ्यांसाठी वापरता येईल. वा बाजारात आयसिंगचे कोन मिळतात (केकवर लिहिण्यासाठी) तेही वापरता येतील.
खायला देण्यापूर्वी उंदीर कायम शीतकपाटामध्ये राहिले पाहिजेत अन्यथा चॉकलेट वितळेल.

माहितीचा स्रोत:हापिसातील मैत्रिण
अधिक टीपा:
माझ्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त तिच्या शाळेमध्ये मी असे चॉकलेट उंदीर करून नेले होते. काही मुलांनी "ईऽऽऽ आम्ही नाही खाणार उंदीर!!" असे म्हणत आधी नाके मुरडली. नंतर मात्र मिटक्या मारत खाल्ला.
हे मनोगत वरुण घेतले आहे.