मंगळवार, २२ जुलै, २००८

उकडीचे मोदक

वाढणी:४ जणांसाठी (१२ ते १५ नग )
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पारीकरता - १/४ किलो बासमती तांदुळाची पिठी ( साधारण १ मोठे भांडे (शिगेस) भरुन )
पीठाएवढेच पाणी
१ मोठा चमचा लोणी / तेल , चवीपुरते मीठ
सारणाकरता - २ नारळांचा चव (खोबरे) (अंदाजे ३ वाट्या)
गुळ अंदाजे २ वाट्या (गोडाच्या आवडीप्रमाणे कमीजास्त चालेल)
आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड
क्रमवार मार्गदर्शन:
सारण - खोबरे व गूळ एकत्र करून मंद आचेवर ठेवावे व ढवळत राहावे. सारण कोरडे झाले (अंदाजे ५ ते ७ मिनिटे) की आवडीप्रमाणे वेलदोड्याची पूड घालून खाली उतरावे.
उकड - तांदूळ स्वच्छ धुऊन चांगले वाळवून पिठी केलेली असावी.
पातेल्यात पाणी तापत ठेवावे. त्यात १ मोठा चमचा लोणी / तेल व चवीपुरते मीठ घालावे. पाणी उकळले की त्यात पिठी घालून उलथण्याच्या टोकाने चांगले ढवळावे आणि झाकण ठेवावे. १ ते २ मिनिटांनी गॅस बंद करावा.
ही उकड गरम असतानाच गार पाण्याचा हात लावून चांगली मळून घ्यावी.
प्रत्यक्ष कृती - उकडीचा छोटा गोळा चांगला मळून घ्यावा. हाताला तेल लावून घेऊन गोळ्याला टोपीचा आकार द्यावा. शक्य तेवढी पातळ वाटी करावी. त्यात १ चमचा सारण भरावे. आता वाटीला चिमटीने जवळ जवळ निऱ्या घालाव्या. निऱ्या करताना हाताला पाणी लावून घ्यावे. निऱ्या झाल्यानंतर वाटी डाव्या हाताच्या तळव्यावर घ्यावी व उजव्या हाताने एकत्र आणून बंद करवी. हे सगळे अत्यंत हलक्या हाताने करावे.
या प्रकारे सगळे मोदक करून घ्यावे व मोदकपात्रात उकडावे. मोदकपात्र नसल्यास एका मोठ्या पातेल्यात पाव भाग पाणी उकळत ठेवावे. ह्या पातेल्यावर बसेल अशी चाळण घ्यावी. चाळणीला तेल लावून घ्यावे. मोदक गार पाण्यात बुडवून काढून चाळणीत ठेवावे. चाळण आधण पाण्याच्या पातेल्यावर ठेवावी आणि वर घट्ट झाकण ठेवावे. १५ मिनिटांनी गॅस बंद करावा.
गरम मोदक वाढून त्यावर तुपाची धार सोडावी.
मी पहिल्यांदाच मनोगतवर लिहीत असल्यामुळे चुका होण्याची शक्यता आहे. तरी मनोगतींनी समजून घ्यावे.
आपल्या प्रतिक्रिया वाचायला नक्कीच आवडतील.
आपल्या प्रतिक्रियांच्या अपेक्षेत
साक्षी
माहितीचा स्रोत:सौ. आई
अधिक टीपा:
हळदीची पाने उपलब्ध असल्यास चाळ्णीत हळदीची पाने घालून त्यावर मोदक ठेवावे. हळदीचा छान वास येतो.
मोदक हे बनवायला किचकट असल्यामुळे सुबक आकार, पातळ पारी या गोष्टी खूप सरावानंतरच जमतील.
हे मनोगत वरुण घेतले आहे.