रविवार, २७ जुलै, २००८

कंदील

साधारण 4 वर्षापूर्वीची कथा आहे. माझे आई-वडील कोकण दर्शनला गेले होते. तीकडून येताना सावंतवाडीवरुन एक लाकडाचा नक्षीदार कंदील घेऊन आले. त्या कन्दीलात बल्ब लावायची सोय आहे. मी लगेच त्यात बल्ब लावून बघितला. सगळ्या घरातल्यानी त्या कंदिलाचे कौतुक केले. मग तो कंदील शोकेसमधे ठेऊन सगळेजण आपापल्या उद्योगाला लागले. पण दुसर्या दिवशी सकाळी आमच्या बाबांचे एक मित्र वारल्याची खबर आली.
नंतर साधारण 2-3 महिने तो कंदील शोकेस मधे होता.दिवाळीच्या आगोदर 15 दिवस घरात अशी कल्पना मांडली गेली की नवीन आकाश-कंदील आणायच्या ऐवजी हाच कंदील आत लाइट लावून वापरावा. त्यानुसार मी त्या कंडीलात दिवा बसवून कसा लागतोय , कसा दिसतोय याचे प्रात्यक्षीक बघितले आणि…..दुसर्या दिवशी आमचे एक जवळचे ओळखीचे गृहस्थ वारल्याची खबर आली.
7-8 दिवस त्यांच्या कार्यात आणि इतर गडबडीत गेले. आणि मी नुसताच टीवी बघत लोळत पडलेला बघून आईने फर्मान सोडले की दिवाळी 8 दिवसावर आली जरा घरी कामात मदत कर. आकाश कंदील तयार आहे का? कधी आणि कुठे लावायचा? नीट लागातोयका ते बघ. मी परत तो कंदील लावून आईला दाखवला. आणि परत….दुसर्या दिवशी सकाळी आमच्या एका ओळखीच्या बाई गेल्याचा सांगावा आला. हा योगायोग पाहून आईची गंमत करायला म्हणून मी म्हणालो “बघ आई, आपण कंदील लावला की कोणी तरी गचकतय”. पण आईला काही ते पटले नाही. तिने ते म्हणणे उडवून लावले.
वसुबारसचा दिवस. सकाळी आंघोळी करून तयार होत आलेल्या फराळावर ताव मारुन मी आकाश कंदील म्हणून तो कंदील लावला. आणि मित्रानो काय सांगू… संध्याकाळी आमच्या घरा समोर राहाणारे एकजण अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले.
मग मात्र आईचा या गोष्टीवर विश्वास बसून तो कंदील तिने मला काढायला लावला.आजुन 1-2 महिने झाल्यावर आई नको म्हणत आसतानाही माझ्या 4 वर्षाच्या पुतण्याच्या आग्रहावरून (त्याला मीच पेटवले होते)पुन्हा एकदा कंदील लावला. मित्रहो काय सांगू तुम्हाला… अहो त्याच दिवशी परत एक ओळखीची व्यक्ती इहालोक सोडून गेली…..
इतके झाल्यावर तो कंदील फक्त शोकेस मधे ठेवण्यात आला.
पण मी ही स्टोरी माझ्या मित्राना खूप रंगवून रंगवून सांगायचो. त्यातील एक पुण्याचा मित्र ती स्टोरी ऐकून फारच प्रभावित झाला. मे महिन्यात सुट्टीला तो माझ्या गावी त्याच्या काकान्कडे आलेला आसताना त्याने माझ्याकडे तो कंदील पहाण्याचा हट्ट धरला. मी पण मानभावी पणे त्याला म्हणालो “कंदील दाखवतो… आपण तो सुरू करून सुध्दा पाहू… पण त्यानंतर जर काही घडले तर माझी जबाबदारी नाही…”.त्यानंतर त्याला कंदील सुरू करून दाखवला. नंतर बराच वेळ गपा मारुन , बाहेर जाउन चहा+सिगरेट मारुन त्याला त्याच्या काकाच्या घरी सोडले. उद्या भेटू असे ठरवून एकमेकाचा निरोप घेतला.
दुसरया दिवशी भेटायच्या वेळेच्या आगोदर त्याचा एसएमएस आला. “गोइंग बॅक तो पुणे, XXX ‘स(आमचा दोघांचा मित्र) मदर एक्सपाइर्ड ”.
मित्रा हो त्यानंतर इतके दिवस त्या कन्दीलाकडे गमतीने पाहणारा मी जाम टरकलो. आणि त्याच दिवशी तो कंदील उचलून माळ्यावर टाकून दिला. आजतागायत तो तिथेच धूळ खात पडलाय.
3-4 वर्षे झाली या घटनेला पण आजूनही तो कंदील डोक्यातून जात नाही. आणि इतकी वर्षे माझ्या डोक्यात फक्त एकच प्रश्न घोळतोय ,’याचा नेम कसा धरायचा?’
(ही एक सत्य घटना आहे। आजूनही तो कंदील आमच्या माळ्यावर आहे. ज्याना खात्री करून घ्यायची आहे त्यानी स्व जबाबदारीवर आमच्या घरी येऊन कंदील लावून खात्री करून घ्यावी)(आमची किन्वा गेलेल्या व्यक्तिन्ची नावे येथे मुद्दामच दिलेली नाहित. उगाच कोणाच्या भावना दुखावण्यात अर्थ नाही)
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.