सोमवार, २८ जुलै, २००८

लाल माठाची भाजी

वाढणी:१ माणसासाठी (१ जुडी लाल माठ ३-४ माणसांसाठी पुरतो, पण त्यातला १/३ घ्यावा. )
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
ताजा लाल माठ, २ लहान कांदे, जिरे, बारीक मोहरी, रसोई मॅजिक रेडी टू कुक महाराष्ट्रीय भाजीचा मसाला
हिंग, चिली गार्लिक बॉल (हा वाटलेली लाल बेडगी मिर्ची, लसूण याचा मेणासारखा घट्ट गोळा तयार मिळ्तो)
नारळ - खोवलेला ओला नारळ , ओला नारळ नसेल तर सुके खोबरे किसावे थोडे व गुलाबी भाजावे
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम माठाची मध्यम आकाराची जुडी आणून पाने काढण्या आधी व जुडी उघडण्या आधीच त्याची मुळे छाटून टाकावीत. मग जुडी सोडा. पाने व त्या सोबत असलेल्या कोवळ्या देठा सकट खुडून मध्यम चिरावीत मगच धुवावीत पाणी गाळून टाकावे. मूळ सोड्ले तर माठाचे अख्खे रोपच खाण्यालायक असते मात्र रोप पेनाच्या इतके जाड व जून असेल तर काठी सारखे मोडते. कोवळे खोड मोड्त नाही ते लवचीक असते.जून व जाड खोड वेगळे चिरावे, भाजीच्या पानात मिसळू नये. याचे शिजवून, कुस्करून अगदी भोपळ्याचे दाही घालून करतात तसे भरीत छान होते. याला जिरे, हिंग, मोहरी, हिरवी मिरची , कडीपत्ता यांची तुपातली फोड्णी देतात.१) कांदा बारीक चिरावा पण भेळेसाठी लागतो तितका बारिक चिरू नये बोटाच्या एक पेरा इतक्या आकाराचा असावा.२) ५० ग्रॅम चिली गार्लिक बॉल मधील, ४/५ ग्रॅम म्हणजे ३/४ वेलदोड्याच्या आकारा इतके वाट्ण काढून घ्यावे. चिली गार्लिक बॉल नसेल तर लसणीच्या ३/४ पाकळ्या बारीक ठेचाव्यात .३) भांड्यात एका माणसाच्या भाजीला लागेल इतके तेल, बारीक आचेवर सावकाश गरम करा. (२५ ते ३५ मिली)४) १/२ टीस्पून जिरे हातावर चांगले चोळून फोड्णीसाठी तापलेल्या तेलात टाका.५) जिरे तडतडू लागले मगच बरीक मोहरी टाका. जिरे तडतडून थोडे गड्द होईल व मोहरी पण तड्तडुन जाईल. ६) गॅस बंद करा व लगेच कांदा टाका, जरा हिंग टाका, परतवा. त्यात चिली गार्लिक बॉलचे वाटण टाका, खोबरे सुके असेल तरच ते या वेळी टाका.( फक्त लासूणच असल्यास तो मात्र यात आत्ता टाकू नका. ) १/४ टीस्पून रसोई मॅजिकचा महाराष्ट्रीय भाजी मसाला टाका, चांगले मिसळूनन घ्या मिनिट्भर हलवत रहा व मगच परत गॅस पेटवा. हा मसाला सर्व भाज्यांसाठी आहे. खूप तिखट नसला तरी जरा झणझणीत असतो. या मसाल्या शिवाय इतर काहीही टाकावे लागत नाही. ७) कांदा जेमतेम शिजला की माठाची चिरलेली पाने व चिरलेली कोवळी देठे टाका. चांगले मिसळा चवी प्रमाणी मीठ घाला. ८) माठाला पाणी सुटू लागले की १/४ टीस्पून रसोई मॅजिकचा महाराष्ट्रीय भाजी मसाला परत एकदा टाका, चांगले मिसळूनन घ्या. झाकण घाला हलकी वाफ काढा. ९) पुढे २ मिनिटानी जर ओला नारळ व लसणाची पेस्ट असेल तर मिसळून मिनीट्भर परत झाकण घाला.१०) पुढे २ मिनिटात भाजीतील देठे शिजल्याचे खात्री झाली की गॅस बंद करा, करण पाने लवकर शिजतात.
लाल माठाची एक वेग़ळीच भाजी तयार होईल.
माहितीचा स्रोत:स्वतः
अधिक टीपा:
ही भाजी तांदुळाची गरम भाकरी, लसुणाची चट्णी, माळेचा पांढरा कांदा, लोणी या बरोबर किंवा भाजलेल्या ब्रेड स्लाईस बरोबरही झकास लागते.मात्र सगळी जादू त्या रसोई मॅजिकच्या मसाल्यात आहे त्या शिवाय ही भाजी चांगली होणारच नाही.
५ रु. ला ५० ग्रॅम याच पॅकींगधे हा मसाला पुण्या-मुंबईत मिळतो. अगोदर नुसता खाऊन त्याची तीव्रता पाहून घ्या. मगच गरजे नुसार भाजीला वापरा.शिजल्यावर माठ आकाराने ५०% ते ७०% कमी होतो.बरेच लोक माठाचे खोड (जून देठ)खात नाहीत. पण माठाच्या रोपाच्या खोडात माठाचे ७५% वजन असते. जून असले तरी ते चवीला चांगले असते. त्यातील तंतू पचनक्रिया सुधारतात. बद्धकोष्ठासारखे विकार असलेल्यांनी रोज खोडासकट माठाची भाजी खावी. संपूर्ण माठाची एक जुडी २५ ते ३० लोहाच्या टॉनिक गोळ्यांच्या बरोबरीचे नैसर्गिक लोह देते, जे बाळंतिणीला फार गरजेचे असते. माठ हा लोहयुक्त व रक्त वर्धक असल्याने रक्तातील हिमोग्लोबिनची कमतरता भरून काढ्तो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.