सोमवार, २८ जुलै, २००८

दहीवडे


वाढणी:१०-१५ जणांना उपहार म्हणून
पाककृतीला लागणारा वेळ:९० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
उडदाची डाळ २ वाट्या
४-५ मिरच्या, आले २-३ इन्च, जिरे २ चमचे, मीठ, साखर चवी/आवडीप्रमाणे
दही २ लिटर
तळणीसाठी तेल
चिंचेची गोड चटणी, जिरेपूड, तिखट, वगैरे वरून घेण्यासठी
क्रमवार मार्गदर्शन:
दही-वडे हा नुसते उपहाराचे खाणे, किंवा जेवणांतला एक पदार्थ असा कोणत्याहि पद्धतीने खाण्याचा आणि सर्वांच्या आवडीचा पदार्थ आहे. आमच्याकडे तो खूप वेळा केला जातो. माझ्या पत्नीचा तो हातखंडा आहे. नुकताच केला असल्याने त्याची कृति मनांत ताजी असतानाच लिहीत आहे. त्यावर तुमची मते, अनुभव, प्रतिक्रिया जरूर कळवा.
२ वाट्या उडदाची डाळ नीट निवडून पाण्यात ३-४ तास भिजत टाका. (हा वेळ कृतीसाठी धरला नाही)
एका भांड्यामध्ये दही, साखर आणि मीठ चवीप्रमाणे घालून, आणि दही खूप घट्ट असल्यास त्यात थोडे पाणी घालून कालवून ठेवा.
जिरे भाजून त्याची भरड पूड करून घ्या. भिजलेली उडदाची डाळ, मिरच्या, आल्याचे तुकडे, जिरे असे सर्व जिन्नस, पाणी न घालता, चांगले घट्ट वाटून घ्या. [रगडा, पाटा-वरवंटा, एकजीवक (ब्लेंडर/मिक्सर), अन्नप्रक्रीयक (फूडप्रोसेसर) यापैकी जे साधन आपल्या सोईचे असेल त्याच्या सहाय्याने करावे. महत्वाचा मुद्दा म्हणजे रवाळ पण घट्ट, एकजीव वाटले गेले पाहिजे.]
एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यांत तोडे मीठ आणि ५-६ चमचे साखर घाला.
मध्यम आकाराच्या कढईमध्ये तेल चांगले तापवून त्यांत वाटलेल्या डाळीचे मध्यम आकाराचे (दीड इन्च व्यासापर्यंत) वडे तळा. मध्यम आंचेवर सावकाश रितीने खुसखुशीत आणि न करपता ताबूस तळा. साधारण ३०-४० वडे होतात.
एक घाणा तळून झाला कि दुसरा घाणा तयार होईस्तो पहिला तळलेला घाण पटकन तयार केलेल्या पाण्यात बुडवून काढा. ते पाणी त्या वड्यात शिरले असते ते लगेच किंचित दाबून पूर्ण काढून टाका व असे मऊ वडे परातीत वा उथळ भांड्यात काढा. पाण्यात पटकन भिजवून ते पाणी आत शिरावे आणि तरीही पाण्याने त्या गरम वड्याचा लगदा न होऊ देणे ही महत्वाची आणि कसबाची गोष्ट आहे.
त्या वड्यावर तयार केलेले दही पसरा.
खायला देताना खाण्याच्या बशीत वरून चिंचेची चटणी, तिखट, जिरे पूड, मीठ इत्यादि आवडीप्रमाणे घाला.
माहितीचा स्रोत:माझी सुगरण पत्नी
अधिक टीपा:
काही जण अशा दहीवड्यावर हळद, हिंग, आणि कढीलिंबाची फोडणी घालतात. आम्हाला वरून चिंचेची चटणी आणि तिखट, जिरेपूड हेच पसंत आहे.
बाहेर उपहारगृहात जाऊन खाण्यापेक्षा घरी करणे आणि ते खाऊ घालणे हेच सुगृहिणीला आवडते. मनसोक्त खायला मी तयार आहेच.