मंगळवार, २२ जुलै, २००८

रसमलाई रोचीन शनि, ०१/०४/२००६ - ०१:५३.

वाढणी:३ ते ४ व्यक्तींसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:२४० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ली. गायीचे दूध,पनीरसाठी
२ ली. म्हशीचे दूध, बासूंदीसाठी
१ चमचा सायट्रीक ऍसिड,
१.५+१ वाटी साखर,
४ वाट्या पाणी,
चारोळी, बदाम, पिस्ता वगैरे.
क्रमवार मार्गदर्शन:
गायीचे दूध गरम करुन घ्यावे. सायट्रीक ऍसिड थोड्या पाण्यात विरघळून घ्यावे. दुधाला एक उकळी आल्यावर सायट्रीक ऍसिडचे पाणी घालून ते फाडावे. चोथा-पाणी वेगळे झाल्यावर गॅस बंद करावा. तयार झालेले पनीर एका फडक्याने गाळून घ्यावे. ही पनीरची पोटली गार पाण्याच्या नळाखाली धरावी व हात घालता येईल इतपत गार करून घ्यावे. एका परातीत हे पनीर काढावे व चांगले मळून घ्यावे. त्याचे हव्या त्या आकारात गोळे करावे.
एका कढईत १ वाटी साखर + ४ वाट्या पाणी एकत्र करुन कच्चा पाक करून घ्यावा. पनीरचे तयार गोळे उकळत्या पाकात घालून झाकण ठेवून १५ मि. शिजवून घ्यावे. मग गॅस बंद करावा.
उरलेल्या २ ली. दूधाची १.५ वाटी साखर घालून बासूंदी करुन घ्यावी. तयार रसगुल्ले हलक्या हाताने दाबून घेऊन बासुंदीत घालावे. एक उकळी आणून गॅस बंद करावा. चारोळी, बदाम, पिस्ता वगैरेची सजावट करावी. शीतकपाटात ठेऊन थंड करावे व मग अर्थातच खावे.
माहितीचा स्रोत:मैत्रीण
अधिक टीपा:
रसमलाई न करता नुसते रसगुल्ले केले तरी चांगले होतात. फक्त आकार थोडा मोठा ठेवावा. पाकात गुलाब किंवा केवड्याचा एक थेंब अर्क घालावा.
वरील रसमलाईत रसगुल्ले व बासूंदी करतांना आंब्याचा रस, स्त्रॉबेरीचा क्रश (योग्य मराठी शब्द सुचवावा.), केशर घालून वैविध्य आणता येईल.
हे मनोगत वरुण घेतले आहे.