शनिवार, २६ जुलै, २००८

मंगळगड ( कांगोरी )

शनिवारी संध्याकाळी साडेसातला लक्षात आलं, की आज शनिवार, मग दोन चार फोन करून आयत्या वेळेला कळवले तरी यायला तयार असणारे नेहेमीचे साथीदार जमवले, अशातला केसू परदेशात त्यामुळे मी, कूल, आरती, सचिन असे चारच जण रविवारी, २२ जूनला सकाळी साडेसहाला निघालो.
पावसाने चांगलीच दडी मारलेली आहे, त्यामुळे भर उन्हात ट्रेक करावा लागतो की काय असे वाटायला लागले आणि मागच्या वर्षी राजमाचीच्या पावसाळी भटकंतीत कसे उन्हात खरपूस भाजून निघालो ते आठवले.
भोर येईपर्यंतच जनतेचे भूक भूक सुरू झाले, मग तिकडेच स्टँडजवळ पोहे, मिसळ कार्यक्रम करून वरंध घाटाकडे कूच केले. नीरा देवघर धरणाच्या जलाशयाच्या बराच वरून डोंगराबरोबर वळसे घेत घेत हा पंचेचाळीस किलोमिटरचा प्रवास आहे. धरण पूर्ण कोरडे पडले होते, त्यामुळे नदीचा प्रवाह आणि जुना पाण्याखाली गेलेला रस्ता अगदी स्पष्ट दिसत होते. हिरडोशी मार्गे रमत गमत वाटेतले काही धबधबे, फुले, पक्षी बघत घाटमाथ्यावर आलो आणि ढगांचे दर्शन झाले, माथ्यावरून थोडे खाली आले की डावीकडे छोटे पठार लागते, या हिरव्यागार पठारावरून चालत गेले की एक मस्त धबधबा, दरीतले एकुलते एक शेत आणि त्यावरचा विद्युत मनोरा हे सगळेच दृष्य अगदी छान दिसते.
वरंध घाट उतरलो, ढालकाठी गावावरून डावीकडे पिंपळवाडीकडे वळलो. पंधरा किमीचा हा रस्ता मध्ये मध्ये बराच खराब आहे, पण आजूबाजूला सागाची गच्च लागवड आणि बरेच धबधभे आणि ओढे आपली सोबत करत राहतात, डुंबायला तर इतक्या एकाहून एक मस्त जागा की थोड्या वेळाने आम्ही आपण परत येतांना इकडे थांबून डुंबू असे म्हणणेही सोडून दिले.
पिंपळवाडी जवळ आले की मंगळगडाचा भव्य माथा अंगावर येउ लागतो. पण वाडीत पोहोचले की मात्र त्याच्या पायथ्याचा पहाड एवढा जवळ येतो, की मंगळगड त्याच्या आड दिसेनासा होतो. पिंपळवाडीला एका अगदी छोट्या देवळाजवळून गडावर जायची वाट आहे, तशी पाटीही तिथे लावलेली आहे. पहिला टप्पा म्हणजे समोरचा पहाड चढून पठार गाठणे, बाराला चढाई सुरू केली आणि तासाभरात पठारावर पोहोचलो. वाट थोडी जंगलातून आहे आणि काही आडव्या वाटांमुळे चुकून जंगलात भटकण्याचीही शक्यता आहे. पण मार्गदर्शनासाठी बाण आहेत. पठार सध्या हिरवेगार झाले आहे आणि चहूबाजूचे फार सुरेख दृष्य मिळते. थोड्याच वेळात नैऋत्येला ढग दाटून आले आणि दरीत पाउस कोसळल्याचा आवाज ऐकू येउ लागला, तो बघ तिकडे पडतोय असे म्हणता म्हणता मग आवाज जवळ जवळ येऊ लागला आणि पाचच मिनिटात आमच्यावर तुडुंब वर्षाव होउ लागला. आम्ही गडाच्या नाकाकडे चालू लागलो तसे थोड्या वेळाने आमच्यावरून पाउस सरकला आणि पन्नासएक फुटांवर संपूर्ण दरीत जोरात कोसळू लागला. घराच्या खिडकीत बसून बाजूला पडणारा मुसळधार पाउस बघावा तसा हा उघड्यावरच अनुभव पहिल्यांदा घेतला. नंतरही पुन्हा एकदा असाच पाउस ऐकण्याचा, स्पर्शण्याचा आणि मग बघण्याचा अनुभव माथ्यावर आला.
गडाच्या नाकाखाली पोहोचण्यचा दुसरा टप्पा पार केला की मग गडाच्या डावीकडून त्याला वळसा घालायचा आणि शेवटी तुटक्या पायर्यांवरून चढत गडात प्रवेश केला की समोरच मंगळाई देवीचे देउळ दिसते आणि त्याच्या मागे एक माची. उजवीकडे कड्याला बिलगून एक वाट वर बालेकिल्ल्याला जाते. बालेकिल्ल्याच्या वाटेत एक मोठी विहिर आहे, वर एका वाड्याचे अवशेष तर दुसर्याचे केवळ जोतेच शिल्लक उरले आहे, त्याच्याही मागे एक माची आहे जी पठारावरून वर येतांना दिसत असते.बालेकिल्ल्यावर आत्ताच गुडघाभर हिरवेगार लुसलुशीत गवत आहे आणि असंख्य रानफुलेही उगवू लागली आहेत. माकडांचा संचार आहेच. बालेकिल्ल्यावर आणि खाली देवळाजवळही पाण्याची टाकी आहेत. देवळावरचे पत्रे अर्धशाबुतावस्थेत आहेत, आणि स्वयंपाकासाठी मोठी मोठी भांडीही देवळात आहेत.
हा किल्ला सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासून थोडा सुटावून, कोकणातून वर येऊन एक माची सह्याद्रीवर तर दुसरी कोकणावर नजर ठेवून असा उभा आहे. त्यामुळे एकाच वेळेला समोरचे उंच राकट कडे, त्यावरून उड्या घेणारे प्रपात आणि त्याचवेळेला खालची भाताची खाचरं, छोट्या छोट्या वाड्या हे सार फार छान दिसतं, खाचरात अजून पाणी भरलेले नाही त्यामुळे एक हिरवा चौकोन आणि एक मातीचा अशी सलग खाचरं एखाद्या बुद्धीबळाच्या पटासारखी दिसतात.
जेवणाचा कार्यक्रम पुढे ढकलून भराभर तासाभरात खाली उतरलो. खाली उतरल्यावर पुन्हा एकदा पावसात चिंब भिजलो. भिजण्यातली खरी मजा ही मनसोक्त भिजून नंतर कोरडे कपडे घालून गाडीत बसले की अनुभवास येते. वाटेत एका ओढ्याकाठच्या देवळात शिदोरी सोडली आणि आलो त्याच मार्गाने नऊ वाजता पुण्यात परतलो.