शुक्रवार, १८ जुलै, २००८

ओल्या नारळाच्या वड्या रोहिणी शुक्र, ०८/१२/२००६ - १७:४३.

वाढणी:२ जण
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
ओल्या नारळाचा खव दीड वाटी/स्वादची कोकनट पावडर
२ चमचे साजूक तूप
अदपाव वाटी दूध
१ वाटी साखर
साखर बुडेल एवढे पाणी
क्रमवार मार्गदर्शन:
साखर बुडेल एवढेच पाणी घेऊन गॅसवर पाक करत ठेवणे. हा पाक एकतारी करणे. त्याचवेळी एकीकडे नारळाचा खव तूपात व दुधात थोडा परतणे. दूध व तूप अशासाठी की वड्या मऊसूत होतात आणि तोंडात टाकल्या की लगेच विरघळतात. एकतारी पाक झाला की लगेच गॅस बंद करून परतलेला नारळाचा खव त्यात घालून चांगळे घोटून घेणे. नंतर हे गरम मिश्रण एका ताटामध्ये ओतून वरून हाताने थापून एकसारखे सपाट करणे. ताटाला आधीच थोडा तूपाचा हात फिरवून घेणे. थापताना पण वरून प्लॅस्टीकचा कागद ठेवून थापणे म्हणजे एकसारखे थापले जाईल व हाताला गरम लागणार नाही.
हे मिश्रण खूप गार झाले की कालथ्याच्या टोकाने किंवा सुरीने एकसारख्या वड्या कापणे. १ वाटीमध्ये लहान १०-१२ वड्या होतात. ह्या वड्या मी स्वादच्या कोकनट पावडरच्या केल्या आहेत.
रवा लाडूमध्ये श्री पेठकर ह्यांनी पाक कसा करावा याची सविस्तर माहीती दिली आहे ती अनुसरून पाक करणे. मी पण तसेच केले. पाकाच्या सविस्तर माहितीसाठी इथे पाहा.
रोहिणीमाहितीचा स्रोत:स्वानुभव
अधिक टीपा:ह्या वड्या उपासाला चालतात। पाहुण्यांना चहाला बोलावले असल्यास पातळ पोह्यांच्या चिवड्याबरोबर किंवा उपास असेल तर तळून केलेल्या बटाट्याच्या चिवड्याबरोबर खावयास देणे. कोणाच्या घरी खाऊ म्हणून न्यायला ह्या वड्या छान दिसतात. बाहेर किती दिवस टिकतात माहीत नाही.
हे मनोगत वरुण घेतले आहे.