सोमवार, २१ जुलै, २००८

हराभरा कबाब प्रभाकर पेठकर मंगळ, ०४/०७/२००६ - ०९:१५.

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पालक अर्धी जुडी.
चण्याची डाळ १ वाटी
अख्खे धणे १ टेबल स्पून
काळे मिरे १०
लवंग १०
दालचीनी २"
वेलची ४
बाद्यान १ फूल
जिरे १ चमचा
जायपत्री अर्धा चमचा
लसूण ७-८ पाकळ्या
आले १ इंच
हिरव्या मिरच्या ४
चिरलेली कोथिंबीर मूठभर
कसूरी मेथी पावडर अर्धा चमचा
कॉर्नफ्लॉवर २-३ टेबलस्पून शीग लावून
मूठभर काजू
तळण्यासाठी तेल
क्रमवार मार्गदर्शन:
चण्याची डाळ ५-६ तास (किंवा रात्रभर) भिजत ठेवून नंतर भरडसर वाटून घ्यावी. घरात मिन्सर असल्यास उत्तम. त्यातून डाळ वाटावी अन्यथा, मिक्सर मध्ये, पाणी न घालता, वाटून घ्यावी. पालक स्वच्छ धुऊन, चिमूटभर खायचा सोडा आणि मीठ घालून शिजवून घ्यावा. शिजवताना झाकण ठेवू नये. पालक लगेच शिजतो. शिजल्यावर गरम पाणी ओतून टाकावे आणि शिजलेला पालक थंड पाण्यात टाकावा. पालक थंड झाल्यावर पाणी निथळवून, दोन्ही हातांच्या पंज्यात पालक नीट दाबून सर्व पाणी काढून टाकावे. आता हा पालक मिक्सरमध्ये (पाणी न घालता) मुलायम वाटून घ्यावा.सर्व गरम मसाला (धणे, मिरे, लवंग, दालचिनी, वेलची, बाद्यान, जिरं, जायपत्री)कोरडाच भाजून घ्यावा आणि थंड झाल्यावर ड्राय ग्राइंडर मधून एकदम बारीक दळावा. लसूण, आलं, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबिरची गोळी वाटून घ्यावी. आता वाटलेली डाळ, वाटलेला पालक, आलं लसूण गोळी, गरम मसाला, मीठ, कसूरी मेथी पावडर हे सर्व एकत्र करावे. नीट एकजीव हिरव्या रंगाचा गोळा तयार होतो. ह्यात आवशक्यते नुसार कॉर्नफ्लॉवर मिसळावी. तेल तापवावे एक सुपारीएवढा गोळा तळून पाहावा. तो मोडला तर अजून कॉर्नफ्लॉवर मिसळावी अन्यथा नको.काजूचे उभे अर्धे भाग करून घ्यावेत.आता मिश्रणातून लिंबाएवढा ऐवज घेऊन त्याचा गोल गोळा बनवावा त्यावर अर्धा काजू, चप्पट भाग वर येईल असा, बसवून तो गोळा पेढ्यासारखा चपटा करावा. असे एकावेळी ८-१० कबाब बनवून मध्यम आंचेवर सर्व कबाब तळून काढावेत.शुभेच्छा....!
माहितीचा स्रोत:निरिक्षण आणि स्वानुअनुभव
अधिक टीपा:एका बशीत, नैवेद्याच्या वाटीत टोमॅटो केचप ठेवून बाजूने ६ ते ८ कबाब ठेवून सादर करावेत।बशीच्या एका कडेवर लेट्यूसचे अर्धे पान त्यावर काकडीच्या, गाजराच्या चकत्या लांबट आकाराच्या चकत्या लावल्या तर तेही अतिशय छान दिसते.
हे मनोगत वरुण घेतले आहे.