सोमवार, २१ जुलै, २००८

पेढे सखि बुध, १३/०९/२००६ - १७:४२.

वाढणी:३५ मध्यम आकारचे (किती जणांना पुरतील ते खव्वयांवर!)
पाककृतीला लागणारा वेळ:१५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ कांडी लोणी (मिठाशिवाय)
१ गोड कंडेंन्सड मिल्कचा डबा
२ कप मिल्क पावडर (कार्नेशन)
केशर, वेलदोडा पूड
क्रमवार मार्गदर्शन:
प्रथम एका मोठ्या काचेच्या भांड्यात लोणी मायक्रोवेव्हमध्ये १ मिनिट वितळवून घ्या. नंतर त्यात कंडेंन्सड मिल्क व मिल्क पावडर नीट मिसळून घ्या. मग दोन मिनिटे सगळं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या. बाहेर काढा, सगळं मिश्रण नीट मिसळून घ्या. १ चमचा दुधात बारीक कुटलेले केशर मिसळून, ते व वेलदोडा पूड वरील मिश्रणात मिसळावी. परत दोन मिनिटे सगळं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या. बाहेर काढा, सगळं मिश्रण नीट मिसळून घ्या. परत दोन मिनिटे सगळं मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये गरम करून घ्या. बाहेर काढा, सगळं मिश्रण नीट मिसळून घ्या. (ही लिहतानाची चुकी नाही, २ मिनिटांसाठी ३ वेळा ठेवावे लागते, म्हणजे पेढे चिकट होत नाहीत.) मिश्रण कोमट झाल्यावर पेढे वळावे (म्हणजे आधी हाताला चटके नको). पेढे कमीतकमी २-३ तास तरी वाळवले की चांगले लागतील. इथे अमेरिकेत ताजा खवा मिळत नसल्याने, हे पेढे खव्याच्या पेढ्यांच्या बरेच जवळचे वाटले.
माहितीचा स्रोत:मैत्रिण ज्योती काणे, स्वानुभव.
अधिक टीपा:
मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये असताना त्याच्याकडे लक्ष असावे, कधीकधी मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा मिश्रण ऊतु जाण्याची शक्यता असते (म्हणून मोठे भांडे घ्यावे), मग १/२-१ मिनिटे भांडे बाहेर काढून परत गरम करून घ्यावे.
पेढे केशरी झाले पाहिजेत, कारण मिश्रणाचा रंग पांढरा येतो. केशराच्या रंगाचा अंदाज घ्यावा, कमी वाटल्यास परत अर्धा चमचा दुधात केशर कुटून घालावे.
बऱ्याच लोकांना वाटले की पूजेसाठी मी अमेरिकेत खास चितळ्यांचे पेढे मागवले होते :)
हे मनोगत वरुण घेतले आहे.