मंगळवार, २९ जुलै, २००८

बटाट्याच्या कचोर्‍या

वाढणी:२ जण(खादाड नसलेले)
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
उकडलेले बटाटे ४-५
मिरच्या ३-४
लसूण पाकळ्या २
मैदा २ वाटी
मीठ चवीपुरते
कोथिंबीर अर्धी वाटी
क्रमवार मार्गदर्शन:१. मिरच्या, लसूण मिक्सरमधे बारीक करुन घ्यावे. २. कोथिंबीर बारीक चिरावी. ३. उकडलेले बटाटे, कोथिंबीर, मीठ, मिरची-लसूण लगदा मळावा. ४. मैदा पोळीच्या कणकेइतका/लाटता येण्याइतका घट्ट भिजवावा. मैद्यात अगदी थोडे चवीपुरते मीठ घालावे.५. मळलेल्या मैद्याचे छोटे गोळे करुन साधारण १० सेमी व्यासाच्या पुर्‍या लाटाव्यात. ६. पुरीच्या मध्याभागी बटाट्याचा सुपारीइतका/थोडा मोठा गोळा ठेऊन आजूबाजूच्या पुरीच्या भागाने ती पुरचुंडी नीट बंद करावी. कुठूनही बटाटा बाहेर डोकाऊ न देता. ७. आता ही तयार पुरचुंडी हलक्या हाताने अगदी थोडी लाटावी बटाटा बाहेर येऊ न देता.(म्हणजे तळायला तेलाची पातळी कमी लागेल पसरट कचोरीसाठी.) ८. तेल तापवून खमंग गडद बदामी रंगावर तळून घ्याव्या. कचोरी तळली गेली कि फुगते. (अर्थात हे माहिती असेलच.)
माहितीचा स्रोत:कचोरी सर्वाना माहिती आहेच. मला बटाटा आवडतो म्हणून मी नुसत्या बटाट्याची केली. नविन शोध नाही.
अधिक टीपा:गरम गरम खा। जितकी खमंग तळलेली असेल तितकी वरचे कुरकुरीत आवरण खायला मजा येते आणि मग आतल्या बटाट्याने तोंड भाजून घ्यायला.बरोबर गोडसर सांबार/ दही-दाण्याचा कूट चटणी/'सॉस भी कभी टोमॅटो था' चांगला लागतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.