शुक्रवार, १८ जुलै, २००८

कविता एक लांबचा प्रवास

प्रेषक रामदास ( मंगळ, 06/03/2008 - 03:26) .


कविता वाचता वाचता कमीत कमी तीस एक वर्षं संपली. आधी गाणी आवडायची म्हणून बर्‍याच कविता पाठ केल्या. नंतर लिहिण्याचे प्रयोग करून पाहीले. आवडत्या कवींची पुस्तकं पाठ झाली.हिंदी गाण्याच्या चालीवर बुद्धजयंतीच्या बार्‍यांमधे कविता लिहिल्या.भजनाच्या मंडळींमध्ये बसून शे दिडशे अभंग पाठ झाले. पण "वारीयाने कुंडल हाले" सारखी गवळण दहा वेळा गाउन त्यातल्या कवितेचा थांग मनाशी लागेना. पाटील बुवांना विचारलं "बुवा समजत नाही हो गवळण ".बुवा हसले .म्हणाले"राधा व्हावं लागतं हो त्यासाठी'..एवढ्यात कसं जमणार ते?".पण मग एकचं नाद लागला कवितेला शोधण्याचा.पण प्रत्येक वेळेला हुलकावणी. परत मी गोंधळात्.आता राधा व्हायचं कसं?कलायडोस्कोपच्या आतली सुंदर रांगोळी दिसावी पण हातात सापडू नये असं व्हायचं.टपटपा गारा पडताना दिसाव्या आणि आपण हाताची ओंजळ करावी पण गार हातात येण्यापूर्वीच पाणी व्हावं असाच अनुभव.आमचे कलेचे सर म्हणाले एकरुपता जाउ द्या थोडसं साधर्म्य साधण्याचा तर प्रयत्न करा.मग ते म्हणाले "बघा विचार करा एखादी कल्पना तुमच्या हातातून , मनातून निसटली तर तुम्हाला कसं वाटतं ?"मी साडीचा सेल्समन मी म्हणलो "शिफॉनचा पदर हातातून सुळकन हातातून निसटतो तसंच"आणि मग लक्षात आलं हळूहळू...मग पिक्चर बघण्याचा नाद लागला, गाणी म्हणता म्हणता कवितेची वळणं समजायला लागली."किसी और शायद कम होगीमुझे तेरी बहोत जरूरत है"हे समजलं प्रेमात पडल्यावर."तू न आये तो क्या , भूल जाये तो क्या ?प्यार करके भूलाना ना आया हमे"हे वर्षभरानंतर समजलं.पण सिनेमाचं थोडं वेगळंच होतं. समोर थोडी तरी चित्रं होती. मराठी कविता हातातून निसटतच जातेय असं वाटत होतं."विरघळून चंद्र आज रक्तातून वाहे " मधुचंद्राच्या दुसर्‍या दिवशी रात्री कळलं.(लग्न, बोडणं , सत्यनारायण होता होता तोफ फुटायची वेळ आली होती ही एक वेगळीच गोष्ट)पण कवितेचा पिच्छा सोडला नाही.आणि कवितेनं पण आपला हट्ट सोडला नाही. बागेश्रीच्या आलापासारखी कायम आर्त पण गूढ ओढ लावत राहिली.अनिल , वा .रा.कांत ,पु.शि. रेगे वेड लावत राहीले आणि मी जुगार्‍याच्या मस्तीत आणखी आणखी दान लावत राहिलो.प्रोणिता दास शी ओळख वाढली तेव्हा रेग्यांची पुष्कळा कळली.(पुष्कळ पुष्कळ अंग तुझं)एकेका वळणावर कविता भेटत राहीली आणि मनाचा उथळ प्रवाह डोह झाला, खोल झाला पण अंधारत ही गेला.--------------------------------------------------------------------------------------------------दोन दिवसा पूर्वी जलपैगुडी हून निघाल्यावर गाडी बंद पडली. आधी थोडी वाट पाहिली नंतर पायउतार झालो.समोर हिरव्यागार भाताची खाचरं मांडून ठेवली होती.मी न बोलता पुढे चालत होतो. संध्याकाळची चार साडेचारची वेळ असावी. ही माझ्या मागोमाग येत येत होती.दूर टेकड्यांना हलका निळा रंग चढत होता.रस्ता सोडून आम्ही दोघंही खाली उतरलो. समोर एक सुंदर तळं .त्यात कमळाची फुलं . पांढरी कमळं.मोठाली हिरवीगार पानं.कमळं पण फार मोठी नाहीत. माझ्या तळहाता एव्हढीच.शिंगाड्याचे वेल अधून मधून वळसे घालत होते.तळही फारसं खोल नसावं. हिरव्या-काळ्या रंगाचा तळ अंधूकसा दिसत होता.मधूनच छोटे छोटे अनंत मासे शाळा सुटल्यासारखे धावत होते. निळसर टेकड्या,मध्येच कसलीतरी खूप हिरवी झाडं, नजरेच्या सहज टप्प्यात नारळीची झाडं , त्याच्या आश्रयाला गवताचं ,बांबूचं छोटसं घर.चारी बाजूनी अंधाराची चाहूल पण हळूहळू. या भागात कधी अंधारेल आणि कधी उजाडेल असं काही सांगता येत नाही.आम्ही दोघंही बोलता बोलता गप्प झालो..तळ्याकाठी स्तब्ध उभे राहिलो .आमच्या चाहूलीनी एक मोठा काळा मासा अंगाला हेलकावे देत पुढे निघून गेला. हिचं लक्ष कमळाकडे.माझ्याकडे बघून मंद हसली.आणि हसतच राहिली. आमच्या मुलीला लहानपणी क म्हणता यायचा नाही.एकटा क म्हणायची पण तमळातला क यायचा नाही.मग बराच वेळ आम्ही दोघही एकएकटे हसत राहिलो.गवताच्या घरातून एक बाई बाहेर आली.काळीसावळीशी. हिरवटं रंगाची विटकी साडी .मला ती अळूच्या पानासारखी दिसली. काळसर जांभळा देठ आणि हिरवा पदर .तळ्याच्यापलीकडून आमच्याकडे पाहिलं आणि तिच्या कामाला लागली. आम्ही दोघंही तळ्यात आणि कमळात.डोक्यावर चतुर उडत होते.वारा पडलेला.मध्येच एका पक्षानं एक अनवट आवाज दिला. कमळाच्या पानाखालून पाणकोंबड्या फडफडून बाहेर आल्या ,दिसेनाशा झाल्या.घरून निघतानाच मनात होतं आता हा शेवटचा हिमालयाचा प्रवास ,पुढच्या वर्षी येउ की नाही ते काही सांगता यायचं नाही.यानंतर सगळा प्रवास मुलांच्या पाठीवरून.मनमुराद बर्फात खेळलो होतो .आता परतीच्या प्रवासाची संध्याकाळ. आम्ही एकएकटे संपवत होतो.गांतोक सोडताना दाबलेला हुंदका आता अंधारून डोळ्यातून तळ्याच्या तळाशी जमा होत होता.गेल्यावर्षी मोठं घर घ्यायचं म्हणून वाडी विकली त्याची राहून राहून आठवण यायला लागली.कर्जाचा बोजा नको म्हणून विहीरसकट सगळी वाडी विकली. वर्षभर नखाला जिव्हाळी लागावी तसं वाटत होतं.तेव्हाच वाटत होतं की आता गाठी सोडवण्याची वर्षं सुरु झाली.तळ्यापलीकडे आता एक नागडं उघडं बाळही धावत आलं होतं.गळ्यात काळागंडा आणि कमरेला चांदीचा करगोटा. हिनं माझ्याकडे पाहिलं. मुलांची दगडाच्या डोणिवरची आंघोळ आठवायला लागली. विहीरीच्या शेवाळी पाण्याचा वास आपोआप नाकाशी आला.लाखो रुपयांचा फ्लॅट पण दाराशी कमळाचं तळ नाही. वाडी विकताना आणलेल्या घंगाळात आता बांबूची झाडं आणि काचेच्या पेटीत मासे.कमळाभवती फिरणारे चतुर आता उंच उडायला लागले होते. चतुरांना अंधाराची चाहूल आधीच लागली होती.मावळणार्‍या सूर्याची एक शेवटची तिरीप तळ्याच्या तळापर्यंत पोचली होती.टिटवीचा आवाज यायला लागला होता.कमळानी अंग आवरते घ्यायला सुरुवात केली. एक एक पाकळी मिटायला लागली होती. आम्ही दोघही एकमेकांशी बोलत नव्हतो पण तळ्याकाठी एकाचं आरशात आम्ही आमचं आयुष्य निरखून पाहत होतो.चित्रकला माझा काही हातखंडा विषय नव्हता पण एकदा हिच्या हातावर मी मेंदीनी कमळंच कमळ काढली होती.त्यानंतरच्या वर्षात कमळं विसरूनचं गेलो होतो.कमळाच्या पाकळ्या तळ्यात उद्या उमलण्यासाठी बंद होत होत्या.आमची कमळं परत उगवतील की नाही ते कळायला मार्ग नव्हता.परत एकदा एक कर्कश टिटवीचा आवाज आला आणि आसपासच्या हिरव्या खाचरातून शेकडो पांढरे पक्षी आकाशाकडे झेपावले .एकाएकी टिटवीचा आलेला आवाज मला रेफ्री फायनल शिटी वाजवतो तसा आला.आम्ही दोघही एकाच आरशातून बाहेर आलो. तळं अंधारलं होतं. कमळं मिटली होती.अंधारात आम्हा दोघांनाही असं वाटलं की आपल्या डोळ्यातलं तळं कुणालाच दिसत नाहीये.ड्रायवरनी आवाज दिला गाडी तयार झाली होती.मी हात पुढे केला. हिनं घट्ट धरून ठेवला. दोघही वर आलो. कोण कोणाला आधार देत होतं ते कळत नव्हतं.पण अचानक लक्षात आलं कवितेची एक ओळ आता समजली.
हातासह सोन्याची सांज गुंफताना बगळ्यांची शुभ्र फुले मिळून मोजतानाकमळापरी मिटत दिवस उमलूनी तळ्यात , बगळ्यांची माळ फुले अजूनी अंबरात।==============================================================कवितेचं एक कडवं समजायला पन्नाशी गाठली. अजून लाखो कविता बाकी आहेत.चौर्‍यांशी लक्षं योनीतून फिरण्याचं प्रयोजन आता मला कळलं आहे. पण हे खोटं असेल तर मॄगजळात समाधी घ्ययला मी सिद्ध आहे
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.