मंगळवार, २२ जुलै, २००८

अप्पम प्रभाकर पेठकर रवि, ०२/०४/२००६ - ०१:००.

वाढणी:चौघांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बासमती तांदूळ २ कप
नारळाचे दूध २ कप
यीस्ट अर्धा टी स्पून
शिजवलेला भात अर्धा कप
मीठ चवी पुरते
साखर १ टी स्पून
क्रमवार मार्गदर्शन:
तांदूळ ३ तास पाण्यात भिजत ठेवा.अर्ध्या नारळाचे २ कप दूध काढून घ्या. त्यातील अर्धी वाटी दूध, दुसऱ्या एका वाटीत, कोमट करून घ्या. त्यात साखर विरघळवून मग यीस्ट घाला आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.३ तासांनंतर तांदूळ रोळीत निथळवून मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या, त्यात शिजवलेला भात घाला, चवी पुरते मीठ घाला आणि थोडे-थोडे नारळाचे दूध घालून गंधा सारखे मुलायम वाटून घ्या. एका मोठ्या पातेल्यात काढून घ्या. (पाणी अजिबात घालायचे नाही.)
एका वाटीत पाव वाटी कोमट पाण्यात साखर विरघळवून त्यात यीस्ट घाला आणि १५ मिनिटे झाकून ठेवा.
१५ मिनिटांनंतर यीस्ट फसफसून येईल. ते तांदूळाच्या मिश्रणात घालून हाताने किंवा चमच्याने निट मिसळून घ्या.
हे मिश्रण ३ तास झाकून ठेवा. ३ तासांनंतर फुगुन दुप्पट होईल.
अप्पमच्या कढईला कापलेल्या कांद्याने तेलाचा पुसट हात लावून घ्या.
कढई मध्यम आंचेवर तापली कि तिच्यात मध्यावर एक डाव मिश्रण टाकून कढई गोलाकार फिरवून मिश्रण कढईभर पातळ पसरवून घ्या. एकदाच फिरवून एक पातळ लेप कढईला लावून घ्यायचा. आणि कढई परत आंचेवर ठेवायची. जास्तीचे मिश्रण (कढईतले) कढईच्या मध्यभागी जमा होते. झाकण ठेवावे. थोड्या वेळाने उघडून पाहिल्यावर अप्पम तयार झाल्याचे दिसून येईल. बाजूने डोश्यासारखा पातळ आणि मध्यभागी इडली सारखा मऊ आणि गोल तयार होईल. हा उलटायचा नाही. तसाच काढून घ्यायचा. (आणि दूसरा लावायचा).
एकूण मिश्रणात १५ ते १६ होतात.
शुभेच्छा....!
माहितीचा स्रोत:सौ. तेजा करंदीकर.
अधिक टीपा:
कुठल्याही मांसाहारी कालवणा बरोबर, शाकाहारी चमचमीत भाज्यांबरोबर किंवा झणझणीत आमटी बरोबर मस्त लागतात.
अप्पमसाठी उथळ नॉन-स्टीक कढया मिळतात. त्या आकाराने लहान असतात. (लिज्जत पापडा एवढ्या.) त्या वापराव्यात. साध्या कढईतही अप्पम चांगले होतात असे ऐकले आहे. पण मी खास अप्पमची कढईच वापरतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.