सोमवार, २८ जुलै, २००८

आमरस-पुरी

वाढणी:४ आमरस भोक्त्यांसाठी.
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
केशरी रंगाचे, मस्त पिकलेले, रत्नागिरी हापूस आंबे - १ डझन
गव्हाचे पीठ ६ वाट्या
रवा अर्धी वाटी
तेल अर्धी वाटी (मोहन)
मीठ चवी पुरते
साखर १ टेबल स्पून
जिरे पावडर चवीनुसार
शुद्ध तुप आवडीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
आंबे स्वच्छ धुवून, कोरडे करून घ्यावेत.सर्व आंबे नीट घोळून घ्यावेत. नंतर देठाकडचा भाग काढून टाकून एखाद्या स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात रस काढून घ्यावा. कोयींना लागलेला गर/रस सुद्धा नीट निपटून घ्यावा. कोयी पांढर्‍या दिसायला लागल्या म्हणजे रस नीट निघाला असे समजायला हरकत नाही. साले उलटी करून (आतील भाग़ बाहेर व बाहेरील भाग आंत करून) शक्य तितका रस काढून घ्यावा. (नंतरसुद्धा या साली चोखायला मजा येते.) हा सर्व रस मिक्सर मधून फिरवून घेतला म्हणजे सुंदर, मुलायम दिसतो. आता हा रस फ्रिज मध्ये गार करायला ठेवून द्यावा.
गव्हाचे पीठ, रवा, चवीपुरते मीठ, साखर, तेल (मोहन) हे जिन्नस एकत्र करून, जरूरी पुरते पाणी घालून, पीठ घट्टसर भिजवून घ्यावे. पीठ अर्धा तास तसेच झाकून ठेवावे. नंतर, गॅसवर कढई ठेवून त्यात पुर्‍या तळण्यासाठी आवश्यक तेवढे तेल ओतावे. मध्यम आंचेवर तेल तापवावे. तेल तापले की पुर्‍या खरपूस तळून घ्याव्यात.
आमरस घेताना, वाटीत आमरस काढून त्यावर चिमुटभर जिरे पावडर भुरभुरावी, दोन चमचे, पातळ केलेले, शुद्ध तुप घ्यावे आवडत असल्यास कणभर मीठ घालून पुरी बरोबर अथवा नुसत्याच आमरसाचा आस्वाद घ्यावा.
शुभेच्छा....!
माहितीचा स्रोत:ति. आई.
अधिक टीपा:
रत्नागिरी हापूसचा मोसम आता सुरू होत आहे. त्याला अनुसरून आमरस-पुरीच्या पाककृतीचे औचित्यपूर्ण आगमन मनोगतावर होत आहे.
थंडगार आमरस चांदीच्या ताट-वाटीत खाण्याची मजा कांही औरच आहे. तसा हा फळांचा सालस राजा स्टीलच्या ताट-वाटीलाही कमी लेखत नाही.
आमरसात साखर घालून त्या 'राजा'चा अपमान करू नये. रस आंबट आहे असे वाटले तर दुध घालून त्याचा आंबटपणा कमी करून आस्वाद घ्यावा.
रत्नागिरी हापूसच्या कोयी बहुगुणी आहेत. त्या धूवून उन्हात वाळवून ठेवाव्यात. अपचन, पोटदुखी, अतिसार वगैरे विकारांवर एखादी वाळविलेली कोय फोडून आतली तुरट बी बाहेर काढून त्याचा (बी चा) शेंगदाण्या एवढा तुकडा चावून खावा, आराम पडतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.