रविवार, २७ जुलै, २००८

कैरीचे आंबट वरण !

वाढणी:४ माणसांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ छोटी वाटी (रोजच्या इतकी) तुरीची डाळ,
दोन मध्यम आकाराचे कांदे, ४/५ हिरव्या मिरच्या
चवी-आवडी नुसार गुळ (लिंबा एव्हढा)
मध्यम आकाराच्या २ कैऱ्या, नारळाचा किस १/२ वाटी
आमटीचा गोडा मसाला व फोडणीचे साहित्य.
क्रमवार मार्गदर्शन:
कांदा उभा पातळ कापून घ्यावा. मिरच्या कापतांना मोठे तुकडे करावेत. कैरी किसून घ्यावी.
डाळ शिजायला ठेवतांनाच कुकर मध्ये कापलेले कांदे व मिरच्या डाळीबरोबरच एकत्र शिजवून घ्यावे.
रोजच्या इतकी डाळ शिजून झाल्यावर फोडणीला टाकावी.
फोडणीत मोहरी, हिंग, मेथीचे १०/१२ दाणे टाकून फोडणी तडतडली की डाळ (कांदा-मिरची सकट) फोडणीला टाकावी.
त्यावर १ चमचा हळद, आवडीनुसार गोडा मसाला, किसलेली कैरी, गुळ व शेवटी ओला नारळ टाकावा.
आवडी/गरजे नुसार पाणी घालावे.
चांगली उकळी येई पर्यंत रटरटले की आंबट वरण तय्यार !
ह्यात शेवगाच्या शेंगा - किंवा - वांगी किंवा - काकडी घातली तरी छान लागते.
कच्च्या कैरी ऐवजी आवडी नुसार चिंचेचा कोळ करून घातला तरी चालेल.
ज्यांना वरणभात हा एकच मेनू असलेले जेवण चालते त्यांनी थोडे जास्त प्रमाण घ्यावे.
माहितीचा स्रोत:माझी सुग्रण आई
अधिक टीपा:
आंबटवरण - भात सोबत तळलेला पापड, हिरव्या मिरच्या अख्या तळून व मिठ लावून, सांडग्या मिरच्या असतील तरी चालतात व खोबरे लसणाची कुटलेली चटणी ..... जेवायचे व मस्त ताणून द्यायची...... !
माझ्या आजोळी आम्ही पोरं सुट्टीत जमली की, रात्री "वरणाचा हंडा लावला का गो ?" अशी आजी आरोळी द्यायची ते अजूनही आठवते. - सांगण्याचे तात्पर्य आंघोळीला आपण जेवढ्या हंड्यात पाणी तापवतो तेव्हढा हंडा भरून एका वेळी आंबटवरण घरात लागायचे - भाताचाही तोच प्रकार पातेली - पातेली भात कधी कधी कमी पडे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.