रविवार, २७ जुलै, २००८

पिठले

वाढणी:४ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
तेल आणि फोडणीचे साहित्य
लसूण, कोथिंबीर, मिरच्या, मीठ
डाळीचे पीठ (बेसन म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचे पीठ) १ वाटी
पाणी
दूध (!!)
क्रमवार मार्गदर्शन:
आम्ही दोघे कामावर जातो, त्यामुळे संध्याकाळी घरी आल्यावर झटपट गरम गरम ताजा स्वयपाक करण्यात माझी पत्नी तरबेज आहे. माझा दर सोमवारचा उपास असतो. तो संध्याकाळी जेवून सोडतो. तेव्हा सोमवारी पिठले भात हा सोपा आणि सुटसुटित बेत ठरून गेला आहे. आल्या आल्या भाताचा दाबपाचक लावून ती पिठले करायला लागते. पिठल्याचे अनेक प्रकार आहेत. तेसर्वच चांगले लागतात. पण खालील कृतीचे पिठले हे तिचे (आणि म्हणुन माझेहि) आवडते आहे. बघा तुम्हाला कसे वाटते ते.
मध्यम आकाराच्या कढईमध्ये अर्धी वाटी तेल तापवून मोहरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करा. फोडणी झाल्यावर त्यात लसूण कापून आणि मिरच्याचे तुकडे पाहिजे त्याप्रमाणे घाला. अधिक/वेगळी चव हवी असल्यास फोडणीत भाजलेले जिरे आणि खोबरे वाटून घाला.
दीड-दोन मिनिटांनी त्यात अर्धा लिटर पाणी आणि पाव लिटर दूध घालून चांगले उकळू द्या. (पिठल्यात दूध घालणे हे आमच्या हिचे वैशिष्ठ्य आहे.) उकळी येत असताना त्या उकळीवर हाताने वरून डाळीचे पीठ हळू हळू पेरा. मोठ्या गुठळ्या होऊ लागल्या तर त्या डावेने किंवा मोठ्या चमच्याने दाबून मोडा. (हा थोडा कौशल्याचा भाग आहे. हात भाजणार नाही याची काळजी घा.) एकीकडे डावेने कालवत रहा. पीठ घालून झाल्यावर विस्तवाची आंच बारीक करा.
चवीप्रमाणे मीठ घाला. कोथिंबीर चिरून घाला. आणखी ५ मिनिटामध्ये विस्तवावरून उतरवा.
झटपट तयार होणारा चविष्ट पदार्थ प्रत्येकाला जरूर आला पाहिजे.
सुभाष
ता.क. मला हे लिहून सुपूर्द करायला लागलेल्या वेळापेक्ष कमी वेळात ते पिठले तयार होते.
माहितीचा स्रोत:माझी सुगरण गृहलक्ष्मी
अधिक टीपा:
पिठल्याचे आणखी प्रकारःकांद्याचे पिठलेकालवून पिठाचे पिठलेकोरडे पिठलेतव्यावरचे पिठले--------

हे मनोगत वरुण घेतले आहे.