मंगळवार, २२ जुलै, २००८

पहिली बायको

माणूस आपलं पहिलं प्रेम विसरत नाही असं म्हणतात. त्यावर माझा आता १००% विश्वास बसलेला आहे. माझंही माझ्या पहिल्या प्रेमाच्या बाबतीत असंच झालं. बाइक घेईन तर RX100 च असं मी बऱ्याच आधी ठरवलं होतं. पण मला सायकल चालवताना पाहूनच बाबांनी मला बाइक घेऊन द्यायची नाही असं ठरवलं होतं. 'सायकलला २ चाकं असतात हे विसरलात का चिरंजीव? ' पासून ते 'अरे आधी सांगितलं असतंस तर पुढचं चाक विकतच घेतलं नसतं' इथपर्यंत अनेक टोमणे मारले. त्या नंतर बरीच वर्ष कधी बाइक ची गरज भासली नाही. पण मला एका आडनिड्या ठिकाणी असलेल्या ऑफिस मध्ये नोकरी लागली आणि बाइक शोध सुरू झाला. बाइक घेईन तर RX100 च हे ठरवल्याने शोध सुरू झाला. पण हिचं प्रोडक्शन बऱ्याच आधी बंद झाल्याने नवीन बाइक घेता येणार नव्हती. गॅरेज मध्ये गेलो तर 'आज काल RX100 कोण विकतं साहेब? ' असं ऐकायला मिळायचं. आशा मावळत चालली होती. बाजूने जाणाऱ्या दुसर्यांच्या RX कडे रोड रोमियो सारखं टक लावून बघणं सुरू झालं होतं. आणि अशातच एके दिवशी मित्राचा फोन आला 'एक बाइक आहे, पटकन ये बघायला. ' बरं वाटत नाही अशी थाप मारून ऑफिस मधून पळालो. बाइक बघितली. आवडली. पण एक प्रॉब्लेम असा होता ही मला बाइक चालवता येत नव्हती. त्यामुळे मग दुसऱ्या मित्राला घेऊन पुन्हा बाइक दर्शन करून आलो. त्याने नीट तपासणी करून बाईकचं हृदय, आतडी वगैरे ठीक आहेत, घेऊन टाक, असा सल्ला दिला. घेऊन टाकली. पहिल्या रात्री जेव्हा बाइक घरासमोर उभी होती तेव्हा मला एक मिनिटही झोप लागली नाही. कधी एकदा सकाळ होतेय आणि कधी एकदा हिला चालवतोय असं झालं होतं.दुसऱ्या दिवशी पासून त्या मित्राने अनलिमिटेड चहा सिगरेटच्या बदल्यात मला बाइक शिकवायला सुरुवात केली.
मी जुनी बाइक घेतली हे बघून बऱ्याच अजाण लोकांनी नाकं मुरडली. पण आता मी आहेच 'मल्लीका सोडून रेखा आवडणाऱ्या कॅटेगरी'तला त्याला कोण काय करणार. ज्यांना ही काय चीज आहे हे माहिती होतं त्यांनी मात्र माझं कौतुकंच केलं. जॅपनीज इंजिनियरिंग म्हणजे काय ह्याचा ही बाइक अत्यंत योग्य नमुना होती. साऊंड, सुसाट पिक-उप, वजनाला हलकी असं सॉलिड काँबिनेशन होतं.
हळू हळू मी आणि माझ्या बाइक मध्ये एक इमोशनल बाँड तयार होत होता. व्यवस्थित चालवता यायला लागल्यावर मी जुन्या दिसणाऱ्या बाइकचा काया पालट करायचं ठरवलं आणि बाइक गॅरेज मध्ये नेऊन टाकली. १५ दिवसांनी बाइक जेव्हा चकाचक होऊन आली तेव्हा मला काय वाटलं हे शब्दात सांगणं शक्य नाही. त्यानंतर मात्र माझी बाइक कायम त्याच कंडिशन मध्ये राहिली. सदैव चकाचक.
ह्या बाइक वर मी प्रचंड भटकलो. तीन साडे तीन वर्षात १, ००, ००+ किमी ची भटकंती केली. कोंकण फिरून आलो. रात्री अपरत्री मुंबई लोणावळा दीड तासात असले आचरट प्रकारही केले. ह्या एवढ्या प्रवासात हिने मला एकदाही दगा दिला नाही. नियमाला अपवाद म्हणूनही नाही. आयुष्य बाइकमय झालं होतं.
आणि एके दिवशी दुधात मिठाचा खडा पडावा तशी माझी बाइक कुणीतरी चोरली. त्या दिवशी माझ्या चेहऱ्यावरचा माज पहिल्यांदा उतरलेला पहिल्याचं लोकांनी सांगितलं. गणपतीचा धावा करणं सुरू झालं. कुठे तरी पडलेली, सोडलेली दिसेल अशी आशा करत होतो. पोलिसात कंप्लेंट नोंदवली होतीच. त्यांनाही रोज फोन करून पिडणं सुरू झालं. मला धीर द्यायचा सोडून एका पोलिसाने मला स्पष्टपणे सांगीतलं 'चोरीला गेलेली RX100 परत मिळाल्याचे अगदी हातावर मोजण्या इतके अनुभव आहेत. तेव्हा तू बाइक परत मिळण्याची आशा सोडून दे. ' माझं बाइक वर असलेलं प्रेम माहिती असल्याने घरचेही हळहळले.
पण मनापासून प्रार्थना केली तर देव नक्की ऐकतो ह्याचा प्रत्यय आला आणि बरोब्बर ११व्या दिवशी मला 'बाइक मिळाली आहे' असा पोलीस स्टेशन मधून फोन आला. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पोलीसांचं उत्तम सहकार्य मिळालं आणि एका आठवड्यात बाइकचा ताबा मिळाला. पण हे ११ दिवस मी अक्षरशः तळमळत काढले. रात्री मध्येच उठून गॅलरीतून डोकावून बघायचो स्वतःहून आली का घरी म्हणून. सुरुवातीचे २-३ दिवस झोपच आली नाही.
बाइक मिळाली आणि आयुष्य पुन्हा एकदा मार्गावर आलं. त्या नंतर थोड्या दिवसांनी मी अजून एक RX घेतली. आता जुन्या बाइक ला फारच जपत होतो. मित्रही २-२ RX आहेत म्हणून हेवा करत होते. फार थोडे अतिशय जवळचे मित्र सोडले तर मी दुसऱ्या कुणालाही कधीही बाइक चालवायला दिली नाही. लोकं वैतागायचे, जोशा माजलाय म्हणायचे.
मी बाइकशी गप्पा मारायचो. सकाळी सकाळी बाइक सुरू केली की फायरिंग ऐकून कळायचं की आज हिचा मूड कसा आहे. पण फार काळ एकत्र रहायचं आमच्या नशिबात नसावं बहुतेक.
मी बँगलोर ला यायच्या थोड्याच आधी माझा अंधेरी जवळ माझा एक मोट्ठा अपघात झाला। ७० च्या स्पीड नि सुमो मध्ये मागून घुसलो. नशिबाने मी कायम हेल्मेट, जॅकेट, ग्लोव्हज घालत असल्याने मला थोडंसंच खरचटलं. पण बाइक चालवण्या पलीकडे गेली होती. तात्पुरती डागडुजी करून बाइक घरी आणली आणि मनावर दगड ठेवून थोड्या दिवसांनी विकून टाकली. पुन्हा त्या नंतरचे २ दिवस मला झोप लागली नाही.
फोटो दिसत नाहियेत। लिंक -
http://www।kodakgallery.com/Slideshow.jsp?UV=8793992157_271794806605&mod...
बुध्दीबळाच्या खेळात राजा किती ही मोठा असला तरी तो व प्यादा खेळानंतर एकाच बॉक्स मध्ये बंद होतात...!