मंगळवार, २२ जुलै, २००८

वांग्याचे भरीत-(खानदेशी) माधव कुळकर्णी गुरु, ०९/०२/२००६ - ११:१९.

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
भरताची मोठी हिरवी वांगी- १ किलो (साधारण ३ मध्यम वांगी).
कांद्याची पात - २ लहान जुड्या.
२ गड्डे लसूण सोललेला. - एक वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली.
८/१० हिरव्या मिरच्या- जाड, लांब व अत्यंत कमी तिखट.
तेल- दोन वाट्या.
फोडणीसाठी मोहरी, हिंग व थोडा ओवा. - आवडीनुसार मीठ.
क्रमवार मार्गदर्शन:
पूर्व तयारी -१. वांग्यांना थोडे तेल लावून वांगी गॅसवर भाजून घेणे. सर्व बाजूंनी चांगली भाजून झाल्यावर अख्खे वांगे ताटात घेऊन सोलून घेणे. (साल काढताना हातांना पाणी लावल्यास साल चिकटत नाही).वांग्यातल्या गुठळ्या व शेडी काढून टाकणे. (बडगी ठेचणी ने ठेचावीत किंवा हाताने चिंच कोळतात तशी एकजीव केल्यास गुठळ्या व शेडी वेगळ्या होतात) उरलेल्या गुठळ्या काढून टाकाव्यात. २. मिरच्यांपैकी ५/६ मिरच्यांचे प्रत्येकी दोन तुकडे करून तव्यावर चमचाभर तेल टाकून पांढऱ्या होईपर्यंत भाजून घेणे. त्यात पाऊण भाग (दीड गड्डा) लसूण घालून त्या मिक्सरमध्ये बारीक करणे (किंवा खलबत्त्यात कुटल्यास उत्तम).३. कांद्याची पात व उरलेला लसूण वेगवेगळे बारीक चिरून घेणे. ४. उरलेल्या मिरच्या (३/४) मधून उभ्या चिरून घेणे (भरतात अख्ख्या टाकण्यासाठी)
कृती
फोडणी साठी भरपूर तेल (दोन वाट्या) एका कढईत गरम करत ठेवावे. तेल चांगले कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, हिंग व ओवा टाकावे. मिक्सर मधून बारीक केलेल्या मिरच्या/लसुणाचे मिश्रण त्यात टाकावे. बारीक चिरलेला लसूण व उभ्या चिरलेल्या मिरच्या त्यात टाकाव्यात. सर्वात शेवटी कांद्याची पात टाकून व व्यवस्थित एकजीव करून सर्व मिश्रण मंद आचेवर शिजवत ठेवावे. कांद्याची पात चांगली शिजल्यावर त्यात वांग्याचे भरीत टाकावे. आवडीनुसार मीठ टाकून मंद आचेवर शिजवत ठेवावे. एक वाफ दिल्यावर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून परत वाफ द्यावी.
वाढताना पातीचे कांदे पातळ चिरून तसेच टमाटा व मुळा कापून खायला देणे. ह्या भरताबरोबर ज्वारीची भाकरी किंवा पुऱ्या छान लागतात- पोळीही चालते. सोबत मिरच्यांचा ठेचा असल्यास उत्तम !
माहितीचा स्रोत:आई व खानदेशी पद्धत.
अधिक टीपा:
१। वांगी देठाकडे नेहमी मऊच असतात ती दुसऱ्या टोकाकडेही मऊ असली पाहिजेत. कापसासारखे मऊ वांगे वजनाला हलके असते व त्यात बिया कमी असतात. वांगी हिरवी असल्यास उत्तम व खानदेशी असल्यास.... बोटे चाटून खाल असे भरीत होईल.परंतू काळे वांगे असले तरी चालेल मात्र भरीत मोठ्या वांग्यांचेच असावे ! २. वांगी शेतात बाभळीच्या काट्यांवर/ काटक्यांवर भाजतात म्हणून त्यांची चव वेगळीच लागते. शहरांत मात्र गॅसवरच भाजावी लागणार-३. वांगी एकजीव करताना गुठळ्या एकजीव होत नसल्यास त्या काढून टाकणे. शेडी व गुठळ्या त्यात राहिल्यास भरीताची चव बिघडते. ४. नेहमी कांद्याची पात फोडणी टाकण्याच्या थोड्या वेळांपूर्वीच कापावी म्हणजे त्याची चव बदलत नाही. ५. ह्या भरतात -मला आवडतात म्हणून- आई अख्ख्या मिरच्या उभ्या चिरून टाकते. आवडत नसल्यास ते टाळले तरी चालेल.
हे मनोगत वरुण घेतले आहे.