सोमवार, २८ जुलै, २००८

दाल माखनी

वाढणी:४ ते ६, कमी वजनाच्या, चविष्टांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
आख्खे उडीद १०० ग्रॅम
राजमा २५ ग्रॅम
कांदा १ मध्यम आकाराचा
तिखट १ टी स्पून
गरम मसाला १/४ टी स्पून
आलं २ इंच
लसूण ६ ते ७ पाकळ्या
बटर ५० ग्रॅम
क्रिम ५० ग्रॅम
कोथिंबीर शोभेपुरती.
मीठ चवीपुरते
तेल २ टेबल स्पून
जिरे १ टी स्पून
क्रमवार मार्गदर्शन:
आदल्या रात्री, भरपूर पाण्यात, आख्खे उडीद आणि राजमा एकत्र भिजत घाला.
दुसर्‍या दिवशी सकाळी...
आलं आणि लसूण वेगवेगळे, अगदी बारीक चॉप करून घ्या.
कांदा, कोथिंबीर बारीक चिरून ठेवा.
भिजवलेले उडीद आणि राजम्यातले पाणी टाकून द्या. दोन्ही कडधान्ये हलक्या हाताने धूऊन, चॉप केलेल्या आल्यातील अर्धे आले घालून, ताज्या पाण्यात शिजवायला ठेवा. सोडा वगैरे टाकण्याची गरज नाही. कडधान्ये पूर्ण शिजली की जास्तीचे पाणी टाकून द्या.
एका पातेल्यात तेल आणि बटर मंद गॅस वर गरम करा. (बटर जळता कामा नाही.) तेल-बटर नीट तापले की त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की उरलेले, चॉप केलेले, अर्धे आले आणि लसूण टाकून परतून घ्या. लसणाचा छान सुगंध आला की कांदा टाकून परतून घ्या. कांदा गुलाबी रंगावर परतला की उडीद, राजमा, तिखट, गरम मसाला आणि मीठ टाकून नीट मिसळून घ्या. गरजे पुरते पाणी टाका. (अंतिम पदार्थ जरा दाटसरच असावा). दाल-माखनी उकळली की क्रिम फेटून त्यात मिसळा. रस दाटसर झाला की खाली उतरवा. (गॅस बंद करा).
दाल-माखनी काचेच्या वाडग्यात काढून त्यावर कोथिंबीर भुरभुरून जेवणाच्या टेबलावर घ्या.
शुभेच्छा..!

माहितीचा स्रोत:संजीव कपूर's - खाना खजाना
अधिक टीपा:दाल-माखनी, गरम-गरम परोठयां बरोबर अथवा लांब शीतांच्या, सुगंधी, बासमती तांदळाच्या पांढर्‍या शुभ्र भाताबरोबर अत्यंत चवीष्ट लागते। (लोणच्याची फोड विसरू नका). जेवणानंतर, कमीत कमी एक तास, कुठलाही आवाज येणार नाही अशा शांत आणि थंड वातावरणात, झो ऽ ऽ प मात्र हवी.
हे मनोगत वरुण घेतले आहे.