शुक्रवार, १८ जुलै, २००८

हाण तिच्या मॉमला (अर्थातच, बे एरिया मराठी लिटरेचर कन्वेन्शन)

प्रेषक सर्किट ( शुक्र, 07/04/2008 - 11:10) .


काय सांगू महाराजा, गेले काही दिवस आम्ही मोरपिसांपेक्षा तलम आणि हलके होऊन साहित्यजगतातील मुष्टियुद्धाच्या रिंगणात बागडतोय. जेव्हा आम्हाला २००९ मधील मराठी साहित्य संमेलन संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात (मराठीत ज्याला सॅन फ्रान्सिस्को बे एरिया म्हणतात) होणार हे कळले, तेव्हापासून मुहम्मद अलीच्या शिकवणीतून आम्ही फुलपाखरासारखे बागडतोय, परंतु मधमाशीसारखा चावा घ्यायची संधी इतक्या लवकर चालून येईल असे वाटले नव्हते.
आता, वरील मराठीप्रचुर वाक्य लिहिताना आम्हाला एवढे हलके व्हायला काही अमराठी पाश्चिमात्य द्रव्यांची (की द्रवांची) मदत झाली, हे कबूल करतो. यापुढील वाक्यांना देखील सदर द्रवाची मदत व्हावी ही सरस्वतीचरणी प्रार्थना.
तर, आम्ही सदर उपसागरीय भागात वास्तव्य करून आहोत. येथील दक्षिणी उपसागरीय प्रांतातील महाराष्ट्र मंडळ नामे मुष्टियुद्धाच्या रिंगणाच्या अगदी जवळच्या जागा आम्हाला लाभल्या आहेत. ह्याचे कारण की आमचे एक जवळचे मित्रच सदर रिंगणाच्या चालकसमितीवर आहेत. आणि तरी देखील सदर साहित्य संमेलन ह्या समितीने स्वत:वर ओढवून घेतलेले आहे, हे आम्हास महाराष्ट्र टाईम्स आणि सकाळ ह्या वृत्तवाहिन्यांतून कळले. (ह्याविषयी आम्ही सदर सदस्याजवळ आमची खंत व्यक्त केली आहेच.)
पण जेव्हा सदर वृत्त आमच्या वाचनात आले, तेव्हा आम्हाला अतोनात आनंद जाहला. आणि आम्ही सदर संमेलनाला आमचा जाहीर पाठिंबा व्यक्त केला. (आमच्या जवळच्या मित्राच्या भीतीमुळे नव्हे, हे येथेच नमूद करू इच्छितो.) पण नुकतेच ह्या दक्षिणी उपसागरीय भागातील कला आणि साहित्य ह्यांना वाहून घेतलेल्या (म्हणजे काय कोण जाणे) एका कला नावाच्या संस्थेचे प्रसिद्धी पत्रक आमच्या वाचनात आले. त्यांना हे साहित्य संमेलन सदर उपसागरीय भागात काय तर कुठेच व्हायला नको आहे, असे दिसते. कारण येथे हे संमेलन होऊ नये, ह्याचे कला ह्या संस्थेने दिलेले मुख्य कारण असे, की जी संस्था (महाराष्ट्र मंडळ) हे संमेलन आयोजित करते आहे, त्यांनी आजवर मराठी साहित्याच्या सदर भागातील उत्थापनासाठी काहीही केलेले नाही. (ह्या उलट सांगलीला गेल्या वर्षीच्या साहित्य संमेलनानंतर मराठी साहित्यप्रेमींची संख्या अतोनात वाढली असून, तेथील मराठी पुस्तकांच्या दुकानदारांनी सध्या वॉरेन बफेटला मागे टाकले आहे, असे आमचा बातमीदार कळवतो. यंदाही रत्नंाग्रीचे लेले-वाचनालय चालवणारे लेले काका-काकू सध्या बाजूच्या नेन्यांना कुठले मर्सिडीजचे मॉडेल जास्त जळवेल ह्याची काळजी करताहेत.)
ह्या मुद्द्याबाबत आम्ही सदर पत्रकाचे लेखक आणि सदर संस्था ह्यांच्याशी अगदी सहमत आहोत. मराठी साहित्याच्या उत्थापनासाठी ह्या उपसागरीय विभागात महाराष्ट्र मंडळाने जे करणे अपेक्षित होते, ते अजिबात केलेले नाहीये. नुस्ते लोकांना आवडेल ते करून साहित्याची गोडी कशी वाढणार? नाही म्हणायला २००३ साली कला ह्या संस्थेच्या दोघा कलाकारांनी महाराष्ट्र मंडळाच्या एकांकिका संमेलनात घडवलेली "एक उलट, एक सुलट" की अशीच काहीतरी एकांकिका अनेकांची साहित्यविषयक अभिरुची वाढवून गेली. पण ती त्या चार तासांपुरतीच. नंतर सगळ्या प्रेक्षकांनी मिडलफिल्डच्या कबर्ली थेटरातल्या बाथरूममध्ये चुळा भरल्या, आणि पुन्हा जैसे थे झाले.
कलाने पण अशाच काही एकांकिका प्रकाशून प्रेक्षकांना चुळा टाकायला लावले आहे. पण त्यांचे लक्ष्य मात्र नेहमीच साधले आहे. प्रेक्षकांना आवडो की न आवडो, साहित्याची सेवा झाली की झाले, काय ?
असो, पण कला ह्या संस्थेचे पत्रक वाचल्यानंतर आम्ही प्रचंड खजील झालो. ह्या दक्षिण उपसागरीय भागातील साहित्यातील दिग्गजांचे म्हणणे ऐकून न घेताच आम्ही आमचे मत व्यक्त केले, ह्याबद्दल आम्हाला खेद झाला. आम्हाला साहित्यातले शष्प देखील कळत नाही, ही आम्हाला आधीच असलेली जाणीव पुन्हा एकदा झाली. (आम्ही लहान होतो, तेवहा अकोल्याला भरलेल्या साहित्य संमेलनात आमची एका असाहित्यिक विठ्ठल वाघ नावाच्या वऱ्हाडी कवीने केलेली तारीफ सदर कलाप्रेमींच्या साहित्यसेवेपुढे अगदीच कमी पडते. गोनीदा -ह्यंानी तळेगावच्या त्यांच्या घरात आमच्या बाल-कवितांची तारीफ केली होती-, हे तर तद्दन लोकप्रियतेच्या मागे धावणारे लेखक. त्यांना "एक सुलट, एक उलट" ची साहित्यसेवा कशी कळणार?)
असो, पण आम्ही सदर संमेलनाला पाठिंबा देताना व्यक्त केलेली कारणे आम्हाला येथे देणे आवश्यक आहे.
आम्ही व्यक्त केलेली कारणे अशी:
१. मूळ महाराष्ट्रात निवृत्त झालेल्या लोकांना म्हातारपणी आपले जुने प्रेम पुनरुज्जीवित करण्यासाठी साहित्य संमेलनांचा उपयोग होतो, असे सांख्यिकी सांगते. हे लोक पुढच्या २० वर्षांत दिवंगत होणार. मग त्यापुढे मराठी साहित्याचे काय ? तरुणांना त्यांची लग्ने जमवण्यासाठी आजवर ह्या साहित्य संमेलनांनी काय केले आहे ? सदर तरुण-तरुणींना लग्ने जमवण्यास मॅकडॉनाल्ड्स, पिझा हट ह्या संस्थांनी साहित्य संमेलनांपेक्षाही अधिक योगदान दिले आहे, असे आमचा भारतातील वार्ताहर कळवतो. (नाही म्हणायला आमच्या परिचयातील एका कला-प्रेमीने.. पण ते जाहीर करायला नको.)
२. सदर संमेलन इंदूर वगैरे ठिकाणीही झाले आहे, असे कळते. तेथील साहित्यिक पुणे-३० ची अधिकृत मराठी न वापरता, हिंदी नावाच्या भाषाभगिनीकडून बलात्कारित कुठलीतरी भाषा वापरतात असे ऐकिवात आहे. इंदूरला जेव्हा साहित्य संमेलन होऊन राहिले होते, तेव्हा सारे रसिक चांगले कपडे पेहनून, इतर रसिकांच्या कपड्यांकडे पाहून राहून, "अपन वोईच घातले असते, तर?" अशा संभ्रमात पडून राह्यले होते, असेही ऐकिवात आहे.
३. सदर साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट संमेलन स्थळाजवळच्या विद्यापीठांतील प्राध्यापकांमध्ये मराठीची आवड निर्माण करणे आहे, असे आम्हाला ह्या उपसागरी क्षेत्रातील मराठी संस्कृतीचे जपणूककार कलाच्या पत्रकातून कळले. सदर पत्रकात, स्टॅनफोर्ड आणि बर्कली ह्या दोन विद्यापीठांचा उल्लेख केलेला आहे. सर्वप्रथम, संत फ्रान्सेश्वर उपसागरीय विभागात फक्त ही दोनच विद्यापीठे आहेत, हा आभास निर्माण केल्याबद्दल कला ह्या संस्थेचा आम्ही निषेध करतो. सॅन होजे सिटी कॉलेज, किंवा २८० वरून स्पष्ट दिसणारी नॅशनल युनिवर्सिटी कलाप्रेमींना दिसू नये, हेही एक नवलच. तरी बरे, हे कलाप्रेमी दर शुक्रवारी कलेच्या संवर्धनासाठी २८० वरून एव्हरग्रीन भागात बैठकीत बसायला जात असतात. (बैठक ह्या शब्दाला हल्ली साहित्यिक भारतात दारूचे साहचर्य प्राप्त झाले आहे. पण कलेच्या संवर्धनासाठी सदर उपसागरीय भागात ज्या बैठका होतात, त्यांना अशी दारूची काळी किनार नसते, बरे का साहित्यप्रेमींनो! - अरे सगळे साहित्यप्रेमी कुठे निघालात ? खऱ्या कलाप्रेमींना आणि साहित्यप्रेमींना बैठकीचे असे अदारू-स्वरूप सहन होणार नाहीच, म्हणा. चालेल, तेवढाच महाराष्ट्र मंडळाचा खर्च कमी. काय ?)
४. आजवर जेवढी मराठी साहित्य संमेलने झालीत त्यातून मराठीचा उद्धार झाल्याचे आकडे काही केल्या मिळत नाहीयेत. उलट, दर वर्षी महाराष्ट्रातील घटणाऱ्या मराठींच्या संख्येविषयीच ऐकिवात आलेले आहे. आता मराठी लोकांची प्रजननशक्ती कमी झाली असेल, असे मानण्यास कुणीही विज्ञानवादी तयार होणार नाही. मग, मराठी लोक कमी झाले कसे ? ह्याविषयी पुणे-३० येथीलच विज्ञानवादी म्हणतात, की मध्यमवर्गीय मराठी मुले अमेरिकेत गेल्यामुळे, मराठींची महाराष्ट्रातली संख्या कमी झाली आहे. असे जर असेल, तर जिथे मराठी लोकांची संख्या वाढते आहे, तिथे मराठी साहित्य संमेलन व्हायला हवे, नाही का ? आपल्या मराठी संस्कृतीची हेळसांड करून उगाच स्वत:च्या आर्थिक वृद्धीसाठी अमेरिकेला गेले्या ह्या मुला/मुलींना आता पुन्हा मराठी साहित्यात गोडी निर्माण करणे आवश्यक अाहे, नाही का ? एकदा का त्यांना "एक उलट एक सुलट" छाप साहित्यात गोडी निर्माण केली, की नक्कीच ती मुले/मुली पुन्हा महाराष्ट्रात परत येतील, आणि महाराष्ट्र धर्म वाढीला लागेल. लोकहो, ह्या उपसागरीय भागातील तथाकथित मराठी लोकांना, फक्त पुलं आणि वपु ह्या तद्दन भिकार (अर्थातच लोकप्रिय) लेखकांपासून दूर करणे (सदर लेखकांना साहित्यिक म्हणणे हे म्हणजे साहित्य ह्या संज्ञेचाच अपमान आहे) हे मराठी कला आणि संस्कृतीच्या जपणुकीसाठी आवश्यक आहे. त्यासाठी येथे जीवनातील भयाण गोष्टींवर प्रकाश टाकणारे नवकवी, चारोळ्याकार, दोनोळ्याकार वगैरे सगळे ख्यातनाम साहित्यिक येणे आवश्यक आहे. एकदा हे सर्व साहित्यिक येथे आले, त्यांच्या सरकारी तिकिटांतून, येथील सर्व तथाकथित रसिकांना गाई-गाई करून गेले, की साहित्य संमेलनाचे उद्दिष्ट सफल झाले.
थोडक्यात, जे सर्वसाधारण लोकंाना आवडते, ह्याला साहित्य म्हणता येत नाही. साहित्य ते, जे लोकांना झोपी घालते. ह्यापूर्वी इंदूरला झालेल्या साहित्य संमेलनात इंदूरच्या ७० टक्के तथाकथित मराठी लोकांना झोपवण्यात सदर साहित्य संमेलन यशस्वी झाले होते. आता संधी आहे ९० टक्‌क्यांची ! त्यामुळे संत फ्रान्सेश्वर उपसागरीय भागात सदर साहित्य संमेलन होणे गरजेचे आहे. येथील माहितीतंत्रज्ञान (आय टी) विभागात काम करणाऱ्या हजारो मराठी युवक-युवतींकडे ह्या साहित्य संमेलनावर खर्च करण्यासाठी पैसे आहेतच, पण मुख्य म्हणजे त्यांना झोपेची गरजही आहे. बिचारे रात्रंदिवस उगाच काम करतात, स्वत:चे पोट भरण्यासाठी. छान साहित्यिक वगैरे झाले असते, तर ?
एक उलट एक सुलट....
हे मिसळ पाव वरुण घेतले आहे.