सोमवार, २८ जुलै, २००८

बांगडा करी


वाढणी:४ ते ६ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
४ ते ६ मध्यम आकाराचे बांगडे.
अर्ध्यापेक्षा थोडा कमी नारळ किसून
६ ते ८ पाकळ्या लसूण
१" आले
१०-१२ कढीलिंबाची पाने
१० - १२ काश्मिरी मिरच्या
एक मध्यम आकाराचा कांदा, बारीक चिरून
एक मध्यम आकाराचा लालबुंद टोमॅटो, बारीक चिरून
अर्धा चमचा हळद
एक टी स्पून कसूरी मेथी पावडर
लिंबा एवढ्या चिंचेचा कोळ
अर्धा टी स्पून गरम मसाला पावडर.
मुठभर कोथिंबीर.
१०-१२ तिरफळे
मिठ चवीनुसार.
अर्धी वाटी तेल.
क्रमवार मार्गदर्शन:
बांगडे विकत घेताना घट्ट शरीराचे, डोळे चमकदार असणारे घ्यावेत. निस्तेज डोळ्यांचे, मऊ पडलेले बांगडे १००% शिळे समजावेत. घेऊ नयेत.
बांगडे घरी आणून पोटातील घाण काढून, साफ करून, स्वच्छ धूवून आणि पूर्णपणे निथळून घ्यावेत. प्रत्येक बांगडा दोन्ही पंजांमध्ये धरून किंचीत दाबून पाणी काढून टाकावे. जास्त जोरात दाबू नये.
बांगड्यांचे डोके काढून टाकून फेकून द्यावे. (किंवा मांजरासाठी ठेवावे). उरलेल्या बांगड्याला हलक्या हाताने, दोन्ही बाजूंनी तिरप्या चिरा देऊन, आकारानुसार प्रत्येकी २ ते ३ तुकडे करावेत. या सर्व तुकड्यांना हळद आणि थोडे मीठ लावून ठेवावे.
काश्मिरी मिरच्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्यावी. पावडर जेवढी बारीक (वस्त्रगाळ) तेवढा रंग खुलून येतो.
मिक्सरच्याच मोठ्या भांड्यात नारळ, आलं-लसूण, काश्मिरी मिरच्यांचे तिखट, कांदा, टोमॅटो, कसूरी मेथी पावडर, चिंचेचा कोळ, गरम मसाला पावडर, कोथिंबीर एकत्र घालून, कमी पाण्यात, गंधासारखे मऊ वाटावे. सर्वात शेवटी तिरफळे घालून दोन-चार फेरे फिरवावेत. (तिरफळे घातल्यावर मिक्सर जास्त चालवू नये नाहीतर त्यांची पावडर होऊन करीत कचकच लागेल.)
एखाद्या पसरट पातेल्यात अर्धी वाटी तेल घालून गरम करावे. त्यात कढीलिंबाची पाने टाकावीत. ती तडतडली आणि कढीलिंबाचा सुगंध आला की मिक्सरमधील, गंधा सारखा, वाटून ठेवलेला मसाला टाकावा. गॅस मध्यम आंचेवर ठेवून मसाला परतत राहावे. सुरूवातीला मसाला सर्व तेल शोषून घेईल. मसाला बराच वेळ परतावा लागतो. वेळ कमी लागावा म्हणून गॅस मोठा करू नये. शेवटी मसाला शिजून त्याला चहूकडून तेल सूटू लागेल. रंग लाल भडक आणि चमकदार होईल. मग त्यात गरजे इतके पाणी आणि चवीप्रमाणे मीठ टाकावे. मसाला नीट मिसळून घ्यावा. झाकण ठेवून करीला उकळी आणावी. (गॅस मोठा करण्यास हरकत नाही) उकळी आल्यावर हळद आणि मीठ लावून ठेवलेले बांगड्याचे तुकडे त्यात सोडावे. गॅस पुन्हा मध्यम आंचेवर करून करीला चांगली १ -२ उकळी आणावी. बांगडे शिजले की गॅस बंद करावा. करीचे तपमान जरा उतरले की कोथिंबीर भुरभुरून बांगडा करी जेवणात घ्यावी.
माहितीचा स्रोत:मित्र परिवार आणि अनुभव.
अधिक टीपा:करी फार घट्ट किंवा फार पातळ असू नये। पोळी बरोबर चांगली लागते पण गरम भातावर विशेष चांगली लागते. (बरोबर कच्चा कांदा विसरू नये.) रेसिपी लिहीता-लिहीताच दहा वेळा माझी जीभ जमिनीपर्यंत खाली घरंगळली ती मोठ्या मुश्किलीने वर उचलून घ्यावी लागली.

हे मनोगत वरुण घेतले आहे।