रविवार, २७ जुलै, २००८

थंडाई

वाढणी:अंदाजे ८ जणाना, एका वेळेस
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
दूध-दीड लिटर
१५ चमचे साखर ,किती गोड आवडते त्यानुसार
१ वाटी भिजवलेली खसखस,१ वाटी भिजवलेले बदाम
पाव वाटी भिजवलेले तुळशीचे बी
१ चमचा वेलदोडा पूड
१ वाटी गुलाबपाणी
क्रमवार मार्गदर्शन:
साधारण ८-१० तास बदाम व खसखस पाण्यात भिजत घाला
दूध थोडे आटवून घ्या, त्यामुळे पाण्याचा अंश कमी होईल. पण बासुंदी होणार नाही याची काळजी घ्या. पूर्ण थंड होऊ द्या.
भिजलेल्या बदामाची साले काढा
तुळशीचे बी, बदाम, खसखस बारीक वाटून घ्या, वाटताना थोडे दूध घातले तरी चालेल.
त्यानंतर साखर, वेलदोडापूड, गुलाबपाणी, गार झालेले दूध, एकत्र करून वरील मिश्रणासह पुन्हा घुसळा.खूप गार हवे असल्यास मिक्सर मध्ये घुसळताना बर्फ घालायला हरकत नाही.
चवीनुसार हवी असल्यास आणखी साखर घाला.
त्यानंतर थंडाई ग्लासात ओतून प्यायला लागा!
'जय जय शिव शंकर' असे गाणे म्हणायचे असेल तर कोणता पदार्थ घालावा लागेल ते माहिती आहेच.
थंडाई मूळात थंड असल्याने त्यात बर्फाची गरज नाही. उष्ण हवामानात थंडाईची मजा औरच असते. मुंबई सारख्या गावी वर्षभर थंडाई प्यायला हरकत नाही.
अधिक टीपा:
आजकाल काही प्रदेशात आटवलेले दूध, बदाम पूड, वेलदोडा पूड, खसखस पूड असे तयार मिळत असेल तर ही कृती करायला अतिशय थोडा वेळ लागेल. पण जिनसा भिजत घालून येणारी चव अधिक चांगली वाटते.
त्यानंतर डोके थंड होईल, थंड डोक्याने झोपी जा वा विचार करा.
दूधाचे व इतर जिनसांचे प्रमाण किती तगडे लोक आहेत त्यांच्यावर अवलंबून आहे. तरी प्रत्येकाने एका वेळी अर्धा कप (ग्लास) थंडाई घेण्यास काहीच हरकत नाही.
काही कारणाने बदाम व खसखस दोन्ही वापरणे शक्य नसेल तर एका वेळी बदाम आणि दुसऱ्या वेळी खसखस असे करा. किंवा त्याचे प्रमाण कमी करा.कारकुनाच्या खिशाला सगळे परवडत नाही म्हणून युक्ती शोधली आहे.
हेच दूध गरम आणि आटवलेले असेल तर मसाला दूध म्हणून वापरता येईल. तेव्हा तुळशीचे बी घालू नका.
हे मनोगत वरुण घेतले आहे.