सोमवार, २८ जुलै, २००८

व्हेज - पुलाव (पांढरा)

वाढणी:७-८ खवय्यांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
३ वाट्या जुने बासमती (लांब दाणा असलेले) तांदूळ
(सर्व मिळून) १ वाटी गाजर, फरसबी, मटार, मक्याचे दाणे, फ्लॉवर
१०-१२ काळी मिरे
४-५ लवंगा
२ तुकडे दालचीनी (प्रत्येकी १ इंच)
४-६ हिरवी वेलची
२ मसाला वेलची
१ टी स्पून शाहीजिरे
२ तमालपत्र
अर्धी वाटी चिरलेली हिरवीगार कोथिंबीर
मीठ चवी पुरते
अर्धीवाटी साजूक तूप
क्रमवार मार्गदर्शन:
तांदूळाच्या पातळीवर राहील इतपत पाण्यात तांदूळ अर्धा तास भिजत टाकावे.
सर्व भाज्या स्वच्छ धुवून कपड्यावर टिपून घ्याव्यात.फरसबीच्या शीरा आणि दोन्ही टोके काढून टाकून त्याचे तिरपे (अंदाजे अर्धा सेंटीमिटरचे ) तुकडे करुन घ्यावेत. गाजराचे साल काढून त्याच्या अर्धा सेंटी. च्या पट्या कराव्यात. प्रत्येक पट्टीचे उभे १ सेंटीचे तुकडे करावेत. ह्या तुकड्यांचे तिरपे (फरसबी सारखेच) एक सेंटीचे तुकडे करावेत. मटार सोलून घ्यावेत. ताजे नाही मिळाले तर बर्फातले (फ्रोजन) वापरावेत.मक्याचे दाणे सोलून घ्यावेत. हे ही ताजे नाही मिळाले तर बर्फातले (फ्रोजन) वापरावेत. फ्लॉवरचे छोटे छोटे तुरे काढून घ्यावेत.(फरसबी, गाजर, मटार, मका आणि फ्लॉवर मिळून फक्त एक वाटी घ्यायचे आहे.)एका छोट्या पातेल्यात वरील भाज्या (एक वाटी) टाकून त्या बुडतील एवढे पाणी घ्यावे. त्यात अद्पाव चमचा (टी स्पून) खायचा सोडा आणि अर्धा चमचा मीठ घालावे. हे पातेले, गॅसवर ठेवून मध्यम आचेवर, झाकण न ठेवता, भाज्या शिजवून घ्याव्यात. भाज्या शिजल्या की लगेच उकळते पाणी गाळून घेऊन भाज्या थंड पाण्यात टाकाव्यात. तांदूळ रोळीत उपसून १० मिनिटं निथळत ठेवावेत.भाज्या शिजवून गाळलेल्या पाण्यात जरूरी इतके पाणी मिसळून एकंदर ३ वाट्या पाणी (सव्वातीन वाट्या चालेल पण जास्त नको) गरम करण्यास ठेवावे. पाणी आधणासारखे तापले की गॅस बंद करून पाणी झाकून ठेवावे.एक जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवावे. त्यात पाववाटी तुप टाकून, तुप तापल्यावर त्यात काळीमिरी, लवंग, दालचीनी, हिरवी वेलची, मसाला वेलची, शाहीजिरे, तमालपत्र टाकावे. लवंगा तडतडून मसाल्याचा वास आला की निथळलेले तांदूळ त्यात टाकावे. हलक्या हाताने परतून घ्यावेत. (तांदूळ मोडता कामा नये). तांदूळ नीट परतल्यावर (सर्व तांदूळाला तुप नीट लागल्यावर) आधणाचे, मोजून ठेवलेले, पाणी त्यात ओतावे. भाज्या शिजवताना त्यात मीठ टाकले होते हे लक्षात ठेवून पाण्यातील मिठाचा अंदाज घेऊन चवीनुसार मीठ टाकावे. झाकण ठेवावे. पाणी उकळले की गॅस अगदी बारीक (गव्हाच्या दाण्या एवढा) करून भात मोकळा शिजवून घ्यावा.भाज्या रोळीत घालून निथळून घ्याव्यात.भात शिजला की एखाद्या परातीत काढून जरा थंड करावा. मधे मधे कलथ्याने (उलथण्याने) वरखाली करून (शीत मोडू न देता) त्यातील वाफ काढून टाकावी.
तेच जाड बुडाचे पातेले पुन्हा, धुवून, गॅस वर ठेवावे. त्यात तुप टाकून, थंड झालेला भात, पाणी काढून टाकलेल्या टाकलेल्या भाज्या टाकाव्यात आणि परतुन घ्यावे. सर्वात शेवटी कोथिंबीर टाकून पुलाव खाली उतरवावा.
अधिक टीपा:
हा पांढरा पुलाव आहे.असाच पिवळा पुलाव करता येतो. पिवळा पुलाव अगदी मंद पिवळा असावा नाहीतर फोडणीचा भात वाटायचा.पिवळा पुलाव करायचा असेल तर मक्याचे दाणे वापरू नये. त्या ऐवजी पनीरचे एक स्केअर सेंटीचे तुकडे वापरावे.पातेल्यात तुप घेऊन शिजवून थंड केलेला भात त्यात टाकावा. अगदी किंचीत हळद त्यात टाकून परतावा. हळद सर्व भाताला लागून लिंबाच्या साली सारखा हलका आणि तजेलदार पिवळा रंग आला की भाज्या टाकून जरा परतावे. सर्वात शेवटी पनीरचे तुकडे आणि कोथिंबीर टाकून नीट मिसळून घ्यावे.
शुभेच्छा...!
हे मनोगत वरुण घेतले आहे.