सोमवार, २१ जुलै, २००८

चिंच पुलिहोरा वरदा रवि, ०६/०८/२००६ - ०२:१६.

वाढणी:४ जणांसाठी पोटभर
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
२ वाट्या तांदूळ
२ लिंबांएवढी चिंच
२ हिरव्या मिरच्या
फोडणीसाठी ४ चमचे तेल, मोहोरी, कढीलिंब, लाल मिरच्या
चण्याची डाळ २ चमचे, शेंगदाणे १ चमचा
हळद १ चमचा, मीठ चवीनुसार
क्रमवार मार्गदर्शन:
२ वाटी तांदूळाचा भात लावावा. भात मोकळा होण्यासाठी आवश्यक तेवढे पाणी घालून शिजवावे, भात जास्त शिजून गोळा झाल्यास खाण्यास मजा येत नाही.
भात शिजत असताना एकीकडे २ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून त्यांचे प्रत्येकी दोन भाग करावे. एका भांड्यात ह्या दोन भाग केलेल्या मिरच्या, चिंच व चिंच बुडेल एवढे पाणी घालून ते मंद आंचेवर उकळायला ठेवावे. हे पाणी अर्धा तास उकळत ठेवावे म्हणजे चिंचेचा कोळ पूर्णपणे निघेल व चिंच+मिरचीची पेस्ट तयार होईल. हे मिश्रण मंद आंचेवरच उकळावे म्हणजे पाणी आटून जळणार नाही. पेस्ट तयार झाल्यावर चिंचेचा कोळ काढून घ्यावा व उर्वरित चोथा बाजूला काढावा.
दुसऱ्या छोट्या भांड्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर मोहोरी, लाल मिरच्या तुकडे करून व कढीलिंब घालावे. फोडणीत चण्याची डाळ व शेंगदाणे घालून चण्याची डाळ लालसर होईपर्यंत तळावे. फोडणीत हळद घालू नये. लाल मिरच्यांचे प्रमाण तिखटाच्या आवडीनुसार कमी-जास्त करता येईल.
शिजलेला भात मोकळा करून घ्यावा. त्यात चिंच-मिरचीचा कोळ, हळद, मीठ व केलेली फोडणी घालून चांगले ढवळावे. हा भात गरमगरम खावा.
माहितीचा स्रोत:नवरा
अधिक टीपा:
सोबत तळलेला पापड छान लागतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.