रविवार, २७ जुलै, २००८

बाजरीच्या पिठाचे पदार्थ

वाढणी:४ जण
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
बाजरीचे पीठ, डाळीचे पीठ, कणिक
जिरे, ओवा, हिंग, हळद, तिखट, काळा मसाला, मीठ, धन्याची पूड
तेल
कांदा, कोथिंबीर
क्रमवार मार्गदर्शन:
बाजरीच्या पिठापासून भाकरी खेरीज आणखी काय करता येईल असे सौ. रोहिणीताईंनी विचारले म्हणून खालील दोन कृति देत आहे.
भाजणी२ वाट्या बाजरीचे पीठ, १ वाटी डाळीचे पीठ, १ वाटी कणिक एकत्र करा. त्यात ओवा, जिरे, हिंग घाला. हे सर्व मिश्रण एका कापडी पुरचुंडीमध्ये (पंचा किंवा अमेरिकेत चीज़-क्लॉथ मिळते त्यात उत्तम होते) बांधा. हे सर्व दाबपाचका मध्ये पाणी घालून त्यात एका कोरड्या पातेल्यात ठेवा. दाबपाचकाचे वजन न लावता १० ते १२ मिनिटे वाफारून घ्या. अशाप्रकारे तयार झालेले पीठ नंतर गुठळ्या मोडून एकत्र करा. ही भाजणी झाली. यात इतर कुठलीही पिठे घालू शकता.
१. थालीपीठ
वरील भाजणीमध्ये कांदा कोथिंबीर चिरून घाला. त्यांत हळद, काळा मसाला, तिखट, मीठ चवीप्रमाणे घाला. पाणी घालून घट्ट मळा.
मूठभर पिठाचा गोळा तापलेल्या तव्यावर थोड्या तेलावर थापा. त्या वरून थोडे पाण्याने हात फिरवून मध्यम जाडीचे थालीपीठ होईल. त्यास ४-५ भोके पाडून त्यात आणखी तेल घाला. खालच्या बाजूने खरपूस होईपर्यंत झाकण ठेऊन शिजवा. नंतर उलटून थोडे भाजू द्या.
हे थालीपीठ लोण्याच्या गोळ्याबरोबर खायला चांगले लागते. वजन वाढ नको असल्यास दह्याबरोबरपण छान लागते. आम्ही शिवाय काकडीची कोशिंबीर करतो त्याच्या जोडीला.
२. कडबोळी
वरील भाजणीमध्ये काळा मसाला, हळद, तिखट, तीळ, धन्याची पूड, मीठ, मोहन म्हणून तापविलेले तेल असे घालून त्यात उकळते पाणी घालून घट्ट भिजवा. नंतर थोडे पीठ हातावर घेऊन तळव्याने त्याची सुरळी करून कडबोळी तयार करा. दोन टोके पाण्याच्या हाताने एकत्र करा. अशी कडबोळी तेलात तळून काढा.
बघा कसे वाटतात ते.
सुभाष
माहितीचा स्रोत:थोडे जनाचे थोडे मनाचे। सर्व व्य्वस्थित खाऊन तपासलेले आहे.
हे मनोगत वरुण घेतले आहे.