सोमवार, २८ जुलै, २००८

व्हेज माखनी

वाढणी:३-४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
फ्लॉवर, फरसबी, गाजर यांचे तुकडे सर्व मिळून अर्धा किलो.
कांदे २ मध्यम
टोमॅटो ४ मध्यम
बटर १०० ग्रॅम
तेल २ टेबल स्पून
फेश क्रिम १०० ग्रॅम
काश्मीरी तिखट १ टि स्पून
गरम मसाला पावडर अर्धा टी स्पून
वेलची पावडर पाव टी स्पून
मीठ चवीनुसार.
साखर १ टी स्पून
खायचा सोडा पाव टी स्पून
लाल रंग
क्रमवार मार्गदर्शन:
फ्लॉवरचे बारीक बारीक तुरे काढून घ्यावेत. फरसबी निवडून (दोन्ही बाजूंच्या शीरा काढून) घ्यावी. गाजर सोलाण्याने सोलून घ्यावे. फरसबी, गाजर यांचे १ स्क्वे. सेंटीमीटरचे तुकडे करून घ्यावेत. फ्लॉवरचे तुरे, फरसबी - गाजराचे तुकडे पाण्यात टाकून त्यात अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा सोडा घालून झाकण न ठेवता अर्धवट शिजवून घ्यावे. गरम पाणी निथळून, भाज्यांवर थंडपाणी ओतावे. थोड्यावेळाने थंड पाणीही निथळून टाकावे.
कांदे लांब चिरून सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. तळलेल्या कांद्याची पेस्ट करून घ्यावी.
तेल आणि बटर गरम करावे (मंद गॅस वर तापवावे. बटर लगेच जळते) तेल-बटर गरम झाले की त्यावर तळलेल्या कांद्याची पेस्ट आणि बारीक चिरलेला टोमॅटो टाकून परतावे. टोमॅटो शिजून एकजीव झाला की लाल तिखट, गरम मसाला, मीठ, वेलची पावडर, साखर टाकून परतावे. ग्रेव्हीला तेल सुटले पाहीजे. आता निथळलेल्या भाज्या त्यात टाकून पाण्याने ग्रेव्ही सारखी करून घ्यावी. ग्रेव्ही दाटसरच असावी.
फ्रेश क्रिम फेटून घ्यावे आणि त्यातील अर्धे ग्रेव्हीत टाकून उरलेले सजावटीसाठी ठेवावे.
आता किंचीत लाल रंग टाकून मिसळावे. पावडर रंग (बुश ब्रँड) चांगला. नसेल तर द्रावस्वरूपातही चालेल. रंग शिजला की (साधारण ३-४ मिनिटे) भाजी सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्यावर उरलेले क्रिम शोभेसाठी वरून टाकावे.
व्हेज माखनी तयार.
शुभेच्छा....!

अधिक टीपा:
यात आवडत असतील तर १ स्क्वे. सेंटीमीटर आकाराचे पनीरचे तुकडेही टाकावेत. (भाज्यां बरोबर)
रंगाचा वापर फारच सांभाळून करावा. रंगाच्या प्रतीवर किती वापरावा हे ठरवावे. बुश ब्रँड पावडर रंग शेंगदाण्याएवढा पूरतो. द्रव्यरूपात असेल तर एक-दोन एक-दोन थेंब टाकत, सर्व भाजीत मिसळत, रंग शिजवावा. अंतीम पदार्थ केशरी रंगाचा व्हावा. लाल नाही. रंग शिजल्यावर अजून गडद होतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.