शनिवार, २६ जुलै, २००८

ऋषीं ची भाजी

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पाव किलो भेंडी (नवधारी असल्यास उत्तम), पाव किलो शिराळ (दोड्कं)
१ मध्यम आकाराची पावसाळी काकडी, २ पावसाळी अळूच्या / हिरव्या अळूच्या जुड्या
लाल माठ २ लहान जुड्या, पाव किलो मक्याचे दाणे.
१ पुर्ण नारळ (खोवलेला) - आवडीनूसार आले व मिरची
ताक-घट्ट व आंबट- २ वाटी किंवा आंबटचूका मिळाल्यास पाव किलो.
आवडीनूसार तेल व जिरें
क्रमवार मार्गदर्शन:
भाज्या धुऊन वेगवेगळ्या चिरून ठेवाव्यात - एकत्र करू नयेत.
भेंडी मोठी असल्यास ३ तुकडे व लहान असल्यास दोन तुकडे करून मध्ये उभी चिरून घ्यावीत.
काकडी व दोडक्यांची साले काढून पातळ चकत्या करून घ्याव्यात.
अळूची पाने व लाल माठ देठ (सोलून) बारीक चिरून घ्यावेत.
अळू कुकरच्या एका डब्यांत / काकडी, दोडके व मक्याचे दाणे एका डब्यांत थोडे पाणी घालून शिजण्यासाठी ठेवावेत. कुकरच्या ६ शिट्ट्या झाल्यावर मंद आचेवर ५ मिनिट ठेवणे.
तोवर नारळाचे दूध काढून घेणे - खोवलेल्या नारळांत वाटीभर कोमट पाणी टाकून मिक्सर मधून काढणे - त्यातच आले मिरच्या एकत्र कापून टाकल्या तरी चालतात किंवा मिक्सरमधून वेगळ्या फिरवल्या तरी चालतील.
एका मोठ्या कढईत आवडीनुसार तेल टाकावे. तेल चांगले तापल्यावर जिऱ्याची फोडणी देणे. त्यावर लगेच उकडलेला अळू टाकून परतावा. त्यानंतर लाल माठाचा पाला व दह्या ऐवजी आंबटचुका वापरणार असल्यास आंबटचुका टाकणे. ह्या भाज्या चांगल्या परतल्या गेल्यावर भेंडी टाकून वर झाकण ठेवणे. मंद आचेवर मधून मधून परतताना भेंडी मऊ झाल्यावर काकडी, शिराळे व मक्याचे दाणे पाण्यासकट भाजीत मिसळणे.
ताक वापरणार असल्यास ताक टाकून कढईतच रवीने घुसळावे. (ताक फाटत नाही व भाजी एकजीव होते) सर्वात शेवटी नारळाचे दूध टाकून मध्यम विस्तवावर चांगली शिजू द्यावी.
हे मनोगत वरुण घेतले आहे.