सोमवार, २८ जुलै, २००८

झणझणीत खानदेशी मिस्सळ

वाढणी:८/१० जणांसाठी पोटभर
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ पाव-मोड आलेली मटकी व १५/२० गोळा भजी काढून तयार ठेवणे.
घरातील फोडणीच्या साहीत्यासह कढीपत्ता व कोणताही ब्रँडेड गरम मसाला व मिठ.
बाजारात मिळणारे पदार्थ-(प्र.१००ग्रॅ.)जाड तिखट शेव, पोह्यांचा चिवडा, पापडी.
आवडत असल्यास थोडेसे खारे दाणे, मिसळी बरोबर खाण्यासाठी पाव.
वरून टाकण्यासाठी बारीक चिरलेला कांदा,टमाटा,बारीक शेंव,कोथिंबीर,लिंबाच्या फोडी ई.
लसणाच्या १५/२० पाकळ्या,२ इंच आलं, तीन मध्यम आकाराचे कांदे
क्रमवार मार्गदर्शन:
तयारी काय करावी -
लसूण व आले ठेचून घ्यावे ,
कांदा बारीक चिरून घ्यावा,
गोळा भजी आधी तयार ठेवावीत.
फरसाण एकजीव करून घ्यावे,
सँपल बनवा
सँपल करायचे आहे ते भांडे किंवा कढई गॅस वर ठेऊन त्यात तेल तापवायला ठेवावे. तेल भरपूर घ्यावे कारण सँपल वर आलेल्या तेलाच्या तवंगाला एक खास चव असते. तेल कडकडीत तापले की त्यात एका मागोमाग एक व वेळ वाया न घालवता फोडणीसाठी साहीत्य टाकावे त्यात मोहरी, जीरें, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, लसूण-आले, व शेवटी बारिक चिरलेला कांदा टाकावा.
कांदा चांगला लाल होईपर्यंत परतावा व नंतर मटकी त्यात टाकावी. मटकी कडक असली म्हणजे सँपल तयार होई पर्यंत व्यवस्थीत शिजते व शेवटी गळत नाही. हे सर्व मिश्रण गॅस वर १० मिनीटे ठेवावे तो पर्यंत दूसऱ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाण्याला ऊकळी आली की ते पाणी मिश्रणात मिसळून १ ऊकळी येऊ द्यावी. हे तयार झाले "सँपल"
वाढतांना -
फरसाण खोलगट डीश मध्ये घालून गोळा भजी वर टाकावीत. त्यावर आधी सँपल मधील खालचा मसाला (रस्सा वगळता) चमच्याने सर्वीकडे सारखा टाकावा. वर नंतर रस्सा व सर्वांत शेवटी तरी (तेलाचा तवंग) 'मारावा'.
सजावट -
बारीक कांदा, बारीक चिरलेली कोथंबीर, बारीक शेव, सोललेले खारे दाणे व लिंबाची फोड वर टाकून ही खोलगट डिश मोठ्या ताटलीत पावा बरोबर सर्व्ह करावी.
खानदेशात मात्र मिसळ नुसती खातात - पावाबरोबर खात नाहीत.

माहितीचा स्रोत:ही खानदेशातली पाककृती आहे व माझ्या आईने लिहून दिली आहे
अधिक टीपा:
१= पाणी जास्त घातले म्हणजे रस्सा पातळ होऊन पावाबरोबर छान लागतो.
२= पाणी नेहमी गरम घालावे म्हणजे मसाल्याची चव बदलत नाही.
३= गोळा भजी नसली तरी चालतात - असली तर चव वाढते.
४= कोथंबीर वरून टाकावी व सँपल शिजत असतांना घालू नये - काळी पडत नाही
५= हिरव्या मिरचीचा ऊपयोग अजिबात करू नये. पुर्ण चव बदलेल.
६= ज्यांना फरसाण आवडत नाही त्यांना"सँपल" हे ऊसळ पाव म्हणून पण खाता येते
हे मनोगत वरुण घेतले आहे.