सोमवार, २८ जुलै, २००८

शेवे ची भाजी

वाढणी:चार जणांना पोटभर
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
घरातील फोडणीच्या साहीत्यासह कढीपत्ता व कोणताही ब्रँडेड मटण मसाला व मिठ.
बाजारात मिळणारे पदार्थ-जाड तिखट शेव (२५०ग्रॅम)
लसणाच्या १५/२० पाकळ्या,२ इंच आलं, तीन मध्यम आकाराचे कांदे
थोडी कोथंबीर, लिंबाच्या फोडी, कांदा गोल कापुन त्यावर लिंबू पिळायचे
क्रमवार मार्गदर्शन:
तयारी काय करावी -
लसूण व आले ठेचून घ्यावे , कांदा बारीक चिरून घ्यावा,
चला कामाला लागा-
भांडे किंवा कढई गॅस वर ठेऊन त्यात तेल तापवायला ठेवावे. तेल भरपूर घ्यावे कारण भाजी वर आलेल्या तेलाच्या तवंगाला एक खास चव असते. तेल कडकडीत तापले की त्यात एका मागोमाग एक व वेळ वाया न घालवता फोडणीसाठी साहीत्य टाकावे त्यात मोहरी, जीरें, हिंग, हळद, लाल तिखट, कढीपत्ता, लसूण-आले, मसाला व शेवटी बारिक चिरलेला कांदा टाकावा.
कांदा चांगला लाल होईपर्यंत व तेल सुटे पर्यंत परतावा - तो पर्यंत दूसऱ्या भांड्यात पाणी गरम करायला ठेवावे. पाण्याला ऊकळी आली की ते पाणी मसाल्यात मिसळून मिठ टाकावे व १ ऊकळी येऊ द्यावी. त्यात मग तिखट जाड शेव टाकावे.


माहितीचा स्रोत:खानदेशी पद्धत आहे ही !
अधिक टीपा:
करायला अगदीच सोप्पी पण चवीला रूचकर !
शेव सर्वांत शेवटी व अगदी जेवण्याच्या आधी टाकावे म्हणजे लोळागोळा न होता त्यांची एक खास चव लागते. मसाला कोणत्याही चांगल्या ब्रँड चा 'मटण मसाला' वापरा.
माझ्या मातोश्रींना टंकलेखन वगैरे जमत नाही म्हणून मीच (तीच्या मदतीने) येथे लिहित असतो... उगाच कुणाला वाटेल मी काय मस्त शेफ वगैरे आहे म्हणून !
तिची एक खास पद्धत म्हणजे ज्या भाज्यांमध्ये पाणी टाकायचे असतें ते पाणी ती आधी उकळून घेते. तीच्या म्हणण्या प्रमाणे त्यामुळे भाज्यांच्या मसाल्याची चव बदलत नाही.
वाढतांना वरून बारीक चिरलेली कोथंबीर टाकायला विसरू नका बरें ! आणी हो, कांदा पात्तळ गोल कापुन त्यावर लिंबू व मिठ मारायचे हाताने भात कालवतो तसे कालवून घ्यायचे व मग ह्या भाजी बरोबर काय लज्जतदार लागतो म्हणून सांगू
हे मनोगत वरुण घेतले आहे.