शनिवार, २६ जुलै, २००८

माहजूब

वाढणी:४ जणांना पोटभर
पाककृतीला लागणारा वेळ:१५० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
५०० ग्रॅ. रवा
१ वाटी तेल
२ मध्यम कांदे, ४ मध्यम टॉमेटो, १ मध्यम कूर्जेट, २ मध्यम ढोबळ्या मिरच्या
जिरे, मिरपूड, मीठ, पाणी इ.
क्रमवार मार्गदर्शन:
माहजूब हा अल्जीरियन न्याहरीचा पदार्थ आहे. रव्याच्या आवरणात भाजीचे सारण भरून तो करतात.
आवरण
एका मोठ्या परातीत रवा घेऊन, त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे. दोन चमचे तेल घालावे. मीठ व तेल रव्यात नीट मिसळून घ्यावे. आता लागेल तसे पाणी घालून रवा भिजवावा. रवा अगदी मऊ भिजला पाहिजे. ५०० ग्रॅ रव्याला मला साधारण पेलाभर पाणी लागले. पीठ मिळून येण्यासाठी वरून तेल घालावे. मी साधारण अर्धी वाटी तेल वापरले. रवा नीट भिजला की नाही हे ओळखण्यासाठी चाचणी अशी: भिजलेल्या पिठाचा एक मोठा लंबगोळा करावा. त्याच्या एका बाजूला थोडे अंतर सोडून हाताची मूठ वळावी (म्ह. वळण्याचा प्रयत्न करावा). पीठ अंगठा व तर्जनी यांच्या मधून बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. हा बाहेर येणारा छोटा गोळा आपोआप पिठापासून सुटला पाहिजे. असे छोटे गोळे करून परातीत ओल्या कापडाखाली झाकून ठेवावेत. एकदा सुटलेल्या गोळ्यांना आकार देण्याचा किंवा मळण्याचा यत्न करू नये. चुकून एखादा दाबला गेला तर परत मोठ्या गोळ्यात मिसळून घ्यावा. एका गोळ्याचा व्यास साधारण ३ सेमी. हे छोटे गोळे किमान अर्धा तास मुरू द्यावेत.
(लागणारा वेळ दीड तास)
सारण
कांदे, टॉमेटो, कूर्जेट (courget), ढो. मिरच्या अश्या सगळ्या भाज्या चिरून घ्याव्या. आवडीप्रमाणे परतल्यावर शिजणाऱ्या कुठल्याही भाज्या वापरल्या तरी चालेल. कढईत दोन चमचे तेल तापवावे; जिरे घालून, चिरलेल्या भाज्या घालून परतून घ्यावे. मीठ, मिरपूड व आवडीप्रमाणे इतर मसाले घालावे.
(लागणारा वेळ अर्धा तास)
माहजूब
तवा मध्यम आंचेवर तापायला ठेवावा. दोन्ही हाताचे तळवे तेलात बुडवून घ्यावे. पोळपाटाला तेल लावून घ्यावे. एक छोटा गोळा पोळपाटावर ठेवून हलक्या हाताने थापटून साधारण पुरीच्या आकाराएव्हढा (~ १०/१२ सेमी व्यास) पसरवून घ्यावा. पुरीच्या कडा चिमटीत पकडून पुरीच्या मध्याच्या विरुद्ध दिशेत ताणावे. बारा वाजण्याच्या घड्याळाच्या काट्यांच्या जागेपासून ताणायला सुरुवात करावी. दोन, चार, सहा, आठ व दहा वाजण्याच्या छोट्या काट्याच्या जागांपासून ताणावे. ताणलेली पुरी/ पोळी साधारण २५ ते ३० सेमी व्यासाची होईल. पुरीचा मधला भाग दाटसर तर ताणलेला भाग पातळ, जवळपास पारदर्शक असा असावा. मधल्या भागावर सारणाचा पातळ थर पसरवून घ्यावा. आता पत्राच्या पाकिटाप्रमाणे घड्या घालून माहजूब बंद करावा. माहजूब आयताकृती किंवा चौरसाकृती (मोठ्या पाकिटासारखा) दिसतो. हलक्या हाताने उचलून तो तापलेल्या तव्यावर ठेवावा. तीन चार वेळा उलटून नीट शिजवून घ्यावा. असे सगळे माहजूब करावेत. दिलेल्या साहित्यात साधारण १५ माहजूब होतात.
(लागणारा वेळ १ तास)
माहितीचा स्रोत:अल्जीरियन मैत्रिणी सब्रिना, जोहरा, रादिया व समिरा
हे मनोगत वरुण घेतले आहे.