शनिवार, २६ जुलै, २००८

खांडवी

वाढणी:गैरलागू
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
१ वाटी वऱ्याचे तांदूळ / भगर
एक/सव्वा वाटी साखर
अर्धी वाटी (किंवा आवडीप्रमाणे कमी जास्त) खवलेले ओले खोबरे
वेलची पूड
साजुक तूप १-२ चमचे
क्रमवार मार्गदर्शन:
एका पातेल्यात पाणी उकळत ठेवावे. दुसरीकडे कढईत साजुक तूप घालून वऱ्याचे तांदूळ 'जरासे'*१ परतून घ्यावेत. पाणी जरा उकळायला लागले की नुकत्याच परतलेल्या वऱ्याच्या तांदुळात उकळलेले पाणी घालून शिजू द्यावे. एक वाफ काढल्यावर त्यात साखर व वेलची पूड घालावे. हे वऱ्याचे तांदूळ, शिऱ्याप्रमाणे मऊसर शिजवून घ्यावे.
एका ताटाला तुपाचा हात लावून त्यावर वऱ्याच्या तांदुळाचा पांढरा शुभ्र शिरा गरम असतानाच थापून घ्यावा. वर भरपूर ओले खोबरे पसरावे आणि वड्या पाडून ताट, वड्या घट्ट होण्यापुरते, शीतकपाटात ठेवावे.
ही खांडवी उपासाला सुद्धा चालते आणि नेहमीच्या उपासाच्या पदार्थांपेक्षा जरा वेगळी.
माहितीचा स्रोत:सौ. आई.
अधिक टीपा:
१. वऱ्याचे तांदूळ फारवेळ परतू नयेत. जरा गरम झाले की लगेच त्यात पाणी ओतावे. तरच खांडवी पांढरीशुभ्र होते.
२. खांडवी साठीचे साखरेचे प्रमाण आपल्याला जितके गोड आवडते त्याप्रमाणात कमी जास्त करावे.
३. वऱ्याचे तांदूळ चटकन शिजतात त्यामुळे फारवेळ वाफ काढत बसू नये आणि शिरा फार कोरडाही होऊ देऊ नये. तसेच शिजत असताना खाली लागू नये म्हणून अधून मधून चमच्याने ढवळत राहावे.
४. खांडवी गार झाल्यावर घट्ट होते पण रव्याच्या वड्यांप्रमाणे कडक होत नाही.
हे मनोगत वरुण घेतले आहे.