शनिवार, २६ जुलै, २००८

सोलकढी

वाढणी:४ जणांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:३० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
नारळ अर्धा
हिरव्या मिरच्या ३ नग
लसूण पाकळ्या ३-४ नग
रसरशीत कोकमं ७-८ नग
बिटरूट १"
कोथिंबिर १ टेबलस्पून
मीठ चवीनुसार
कोमट पाणी १-१/२ ग्लास.
क्रमवार मार्गदर्शन:चांगली रसरशीत कोकमं (आमसूलं) घेऊन वाटीभर कोमट पाण्यात ७-८ तास भिजत घालावीत. नारळ किसून घ्यावा.किसलेला नारळ, चिरलेल्या मिरच्या, सोलून तुकडे केलेल्या लसूण पाकळ्या, आणि बारीक केलेलं बीटरूट हे सर्व मिक्सर मध्ये घालून अर्धा ग्लास (किंवा जरा जास्त) पाण्यात एकदम बाऽऽऽरीक वाटावं. तसं वाटून झालं की पुन्हा अर्धा ग्लास पाणी घालून वाटावं. नंतर एखाद्या पातळ कपड्यातून गाळून घ्यावं. हे साधारण गुलबक्षी रंगाचे, नारळाचे दूध तयार होते. कपड्यातील चोथा पूर्ण पिळून घ्यावा. हा चोथा पुन्हा मिक्सरमध्ये घालून आणि अर्धा ग्लास कोमट पाणी घालून आणखीन वाटून घ्यावा आणि वाटल्यावर आधीच्या प्रमाणेच पातळ कपड्यातून गाळून घ्यावा. आधीचे आणि हे आताचे, दोन्ही दूधं एकत्र करावी.कोकमं (आमसूलं) वाटीतल्या पाण्यातच हाताने चुरून, दाबून त्याचा कोनफळी रंगाचा रस काढावा. हा रस गाळून नारळाच्या दुधात मिसळावा. चवीनुसार मीठ घालावे आणि वरून कोथिंबीर भुरभुरावी.सोलकढी तयार.शुभेच्छा...!
अधिक टीपा:आमसूलं ताजी, ओलसर, कोनफळी रंगाची असावीत।आमसुलांऐवजी आमसुलांचा रस, आगळ, मिळतो तो वापरला तरी चालेल. पण तो नेहमी एकाच विश्वासू माणसा कडून घ्यावा. (खूप जणं फसवतात.)लसूण, मिरच्या आणि आमसुलांची मात्रा आपल्या आवडीनुसार बदलण्यास हरकत नाही.कांही जणं सोलकढीला जीऱ्याची फोडणीही देतात. आवडत असेल तर हरकत नाही. (मला मात्र बिनफोडणीची सोलकढी जास्त आवडते.)सोलकढी पित्त शामक आणि थंड आहे. परंतु त्यात नारळाचे दूध आहे त्यामुळे कोलेस्टरॉलवर नजर ठेवावी. तशी धास्ती नाही, पण अतिसेवन हानिकारक.
हे मनोगत वरुण घेतले आहे.