सोमवार, २८ जुलै, २००८

टोमॅटो ऑम्लेट

वाढणी:४ खवय्यांसाठी
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
डाळीचे पीठ (बेसन) २ वाट्या
लालबूंद टोमॅटो ४-५
आले १ इंच
काश्मिरी मिरची पावडर १ टी स्पून
मीठ चवी नुसार
तेल थोडेसे
टोमॅटो केचप
पावाचे स्लाईस ४
नारळ अर्धी कवड
कोथिंबीर दोन मुठी
हिरव्या मिरच्या ५-६
पुदीना मुठभर
लिंबू किंवा चिंच चवी पुरती.
बटर
बारीक चिरलेला कांदा १ (मध्यम नग)
क्रमवार मार्गदर्शन:
नारळ, कोथिंबीर, मिरच्या, पुदीना यांची हिरवीगार, मऊसर, झणझणीत चटणी करून घ्या. त्यात चवी पुरते लिंबू, मीठ घाला.
गॅसवर टोमॅटो बुडतील इतके पाणी उकळायला ठेवून, पाणी उकळले की त्यात आख्खे टोमॅटो टाका. दोन मिनिटे उकळवून, टोमॅटो, उकळत्या पाण्यातून काढून थंड पाण्यात सोडा. २ - ३ मिनिटांनी थंड पाण्यातून बाहेर काढून त्यांचे साल काढून टाका. आता, हा टोमॅटोचा गर मिक्सर मध्ये घालून ग्राईंड करून (वाटून?), त्याचा रस बनवून घ्या. हा टोमॅटो रस गाळून घ्या.
आता, चण्याच्या पिठात मावेल इतका टोमॅटोचा रस त्यात घालून, गुठळ्या राहाणार नाहीत असा, मिसळून घ्या. मिश्रण पळीवाढं झालं पाहिजे. रस एकदम न मिसळता गरज भासेल तसा थोडा-थोडा मिसळत जावा. या मिश्रणात, काश्मीरी मीरची पावडर, बारीक चॉप केलेलं आलं, मीठ आणि थोडी कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण जास्त दाट वाटत असेल तर पाण्याने नीट (पळीवाढं) करून घ्या.
नॉन-स्टीक फ्राय पॅन (तवा?) गॅसवर ठेवून त्याला तेलाचा पुसट हात लावून घ्या. पॅन तापला की लिज्जत पापडाच्या आकाराचे जाडसर ऑम्लेट पॅन मध्ये टाका. झाकण ठेवून शिजवून घ्या. शिजल्यावर परतवून पुन्हा थोडे शिजवा.
दोन्ही बाजूंनी शिजल्यावर प्लेट मध्ये काढून घ्या. या ऑम्लेट बरोबर हिरवी चटणी, लाल टोमॅटो केचप, बाजू कापलेले पावाचे दोन त्रिकोण, बटर आणि बारीक चिरलेला कांदा खावयास द्या.
शुभेच्छा...!
माहितीचा स्रोत:निरिक्षण आणि अनुभव
अधिक टीपा:
टोमॅटो ऑम्लेट, सुरी-काट्याने खाण्यात मजा आहे.
गरम-गरम ऑम्लेटवर बटर पसरवून घ्यायचं. नंतर त्यावर हिरवी चटणी, लाल केचप पसरवायचं. त्यावर कच्चा कांदा भुरभुरून टाकायचा. पावाचा एक तुकडा (सुरीने कापून) काट्याला टोचून घेऊन ऑम्लेटचा तुकडा (पुन्हा सुरीने कापून) त्याच काट्याला टोचून खायचा. व्व्व्वा ऽ ऽ!

हे मनोगत वरुण घेतले आहे.