रविवार, २७ जुलै, २००८

मेतकूट

वाढणी:कसे व किती खाल त्यावर अवलंबून
पाककृतीला लागणारा वेळ:६० मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
हरभरा डाळ ४ वाट्या
मूग डाळ १ वाटी
उडीद डाळ दीड वाटी
मसूर डाळ अर्धी वाटी
जिरे व धणे प्रत्येकी २ चमचे (चहाचा चमचा)
मेथी १ चमचा
लाल तिखट ६ चमचे (आवडीनुसार प्रमाण कमी-जास्त करावे)
लवंगा व काळी मिरी २०-२५ प्रत्येकी
दालचिनी ८ ते १० तुकडे
हिंगाचा खडा
हळकुंड २ तुकडे (किंव हळद)
मीठ चवीपुरते
क्रमवार मार्गदर्शन:
१. सर्व डाळी वेगवेगळ्या भाजून घ्याव्यात. भाजताना सुरुवातीला गॅस मोठा असावा, नंतर मंद आचेवर डाळी खरपूस भाजाव्यात. (लालसर खरपूस भाजल्यास मेतकूटाला रंग चांगला येतो व मेतकूट चांगले टिकते.) भाजल्यावर डाळी एकत्र कराव्यात.
२. भाजल्यावर डाळी एका कापडावर किंवा वर्तमानपत्रावर पसराव्यात म्हणजे त्या हळूहळू गार होतील. (धातूच्या पात्रात/ परातीत ठेवल्यास एकदम थंड झाल्याने कडक होतील व मिक्सरमधे वाटणे सोयीचे होणार नाही.)
३. धणे, जिरे, मेथी, दालचिनी, लवंगा, काळी मिरी, हळकुंड, हिंग वेगळे - वेगळे भाजून घ्यावे. मीठही थोडे गरम करून घ्यावे.
४. भाजलेले सर्व पदार्थ एकत्र करावेत. त्यात लाल तिखट (मिरची पूड) घालावी. हळकुंडाच्या ऐवजी हळद पूड वापरणार असाल तर तीही घालावी आणि सर्व मिश्रण सामान्य तपमानाला आल्यावर मिक्सरमधे बारीक करावे. भाजल्यामुळे डाळी हलक्या होतात व मेतकूट मिक्सरमधे सहजपणे दळता येते.
५. छोट्या छिद्राच्या चाळणीने मेतकूट चाळून घ्यावे.
साजूक तूप,गरमागरम भात,मेतकूट असा बेत लोकप्रिय आहे. मेतकुटात बारीक चिरलेला कांदा, दही घालून चपाती-भाकरीशीही खातात.

माहितीचा स्रोत:अमेरिकेहून माझी बहीण भारतात आली की तिच्यासाठी मेतकूट करून द्यायला घरी येणारी माझी मैत्रीण
हे मनोगत वरुण घेतले आहे.