मंगळवार, २२ जुलै, २००८

सुरणाचा कीस

वाढणी:२-३ जणांना
पाककृतीला लागणारा वेळ:४५ मिनिटे
पाककृतीचे जिन्नस
पाव किलो सुरण
पाव वाटी मुगाची डाळ
१-२ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार कमी-जास्त
१-२ आमसुले
खवलेले ओले खोबरे, कोथिंबीर
मीठ चवीनुसार आणि फोडणीचे साहित्य
क्रमवार मार्गदर्शन:
मुगाची डाळ थोड्या पाण्यात भिजत घालावी. सुरणाची साले काढून सुरण किसून घ्यावा. सुरण उघडा राहिल्यास त्याचा रंग लगेच बदलतो त्यामुळे किसल्या किसल्या लगेच पाण्यात घालून ठेवावा.
खोबरे खवून घ्यावे. मिरच्यांना उभा छेद द्यावा. मुगाची डाळ चांगली भिजली आणि फोडणीची बाकी तयारी झाली की मग पाण्यात ठेवलेला सुरणाचा कीस हाताने चांगला घट्ट पिळून त्यातले पाणी काढून टाकावे. (काकडीची कोशिंबीर करताना जसे पिळतात तसे)
सुरण खूप खाजरा असल्यास कीस पिळून घेतल्यावर हात खाजायला सुरुवात होते. तसे झाल्यास आमसुले हातावर घासावी किंवा कोकमाच्या आगळाने हात चोळावेत. (यासाठी लागणारी आमसुले पाककृतीच्या जिन्नसांमधे धरलेली नाहीत.) शिवाय कीस पाण्यात घातल्यावर त्यात थोडे कोकम आगळ टाकून ठेवले तर बरे.
हाताची खाज कमी झाल्यावर कीस/भाजी करायला हरकत नाही..
एका कढईत फोडणी करून घ्यावी. त्यात मिरच्या घालाव्या. मग मुगाच्या डाळीतले पाणी काढून टाकून फोडणीत डाळ टाकून २ मिनिटे परतावी. नंतर त्यात कीस घालावा आणि जरा परतावे. मग त्यात १-२ आमसुले टाकावीत आणि पाण्याचे झाकण ठेवून वाफवून घ्यावे. एक वाफ झाल्यावर त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालावे. मग सढळ हस्ते खोबरे आणि थोडी चिरलेली कोथिंबीर घालावी. आणि पुन्हा वाफ काढावी. खाली लागू नये म्हणून मधून मधून चमच्याने परतत सुरणाचा कीस शिजू द्यावा.
माहितीचा स्रोत:सौ. आई आणि स्वानुभव
अधिक टीपा:
हा कीस गरम गरम खायला एकदम खमंग लागतो। भाजी म्हणून पोळीबरोबरही खायला मस्त किंवा रताळ्याच्या किसाप्रमाणे वाटीत घेऊनही खाता येतो. सुरणाची रस-भाजी न आवडणाऱ्या लोकांना हा प्रकार नक्की आवडेल. मुगाच्या डाळी ऐवजी किसामधे शेंगदाण्याचे जाडसर कूट घातल्यास आणि तुपा-जिऱ्याची फोडणी केल्यास उपासालाही चालतो.
हे मनोगत वरुण घेतले आहे.