शनिवार, २३ ऑगस्ट, २००८

ज्वारीचे नूडल्स

चायनीज पदार्थ आवडणाऱ्या, भाज्या, भाकरी न खाणाऱ्या मुलांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी पौष्टिक पदार्थ करून पाहा। ......
साहित्य -दोन वाट्या ज्वारीचे पीठ, कोबी, गाजर, फ्लॉवर, ढोबळी मिरची प्रत्येकी एक वाटी, स्वीट कॉर्नचे दाणे, मोड आलेले मूग, मटार, भिजवलेले शेंगदाणे, डाळिंबाचे दाणे प्रत्येकी अर्धी वाटी, फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग, रिफाईंड तेल एक डाव, चवीपुरते मीठ, लसूण- आलं पेस्ट दोन चमचे.
कृती -आपण भाकरीसाठी जसे पीठ मळतो तसे चवीपुरते मीठ घालून ज्वारीचे पीठ मळावे. सोऱ्याला थोडासा तेलाचा हात लावून त्यात शेवेची जाड ताटली घालून शेव चाळणीवर पाडावी व आपण उकडीचे मोदक वाफवतो त्याप्रमाणे शेव चमक येईपर्यंत वाफवावी. सर्व भाज्या बारीक उभ्या चिराव्यात. कढईत तेल, मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. त्यात नंतर आलं- लसूण पेस्ट घालावी. नंतर सर्व भाज्या घालाव्यात. सर्व भाज्या वाफल्यावर त्यात ज्वारीचे नूडल्स घालावेत. हलक्‍या हाताने नूडल्स, भाज्या परताव्यात. वरून थोडे चवीपुरते मीठ घालावे. गरम गरम नूडल्स सर्व्ह करावेत.
टिप - अशाप्रकारे आपण नाचणी, मका, तांदूळ, बाजरी या पिठांचेही नूडल्स करू शकतो.