गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

काहीही नाव द्या...

खर म्हणजे हा एक प्रयोग होता. आता कोणता?? तर.. कटलेट बनवणे. म्हणजे कटलेट असं नाही म्हणता येणार पण, पॅटीस, किंवा अगदी भजी सुद्धा म्हणता येईल.एरवी, भाजी- आमटी उरली की त्याची थालीपीठे करायची हा ठरलेला नेम. पण यावेळी म्हंटलं थोडं वेगळं करावं. कारण जी भाजी उरली होती ती जर थालीपीठात घातली असती तर त्याचं नक्की काय झालं असतं हे जरा सांगणं कठीणच. ती भाजी होती, पालक्-पनीर. त्या वाह रे वाह शेफ संजय टुम्मा ष्टाईल मध्ये केलेली. ती भाजी जरी उत्तम होत असली चवीला तरी शेवटी ती कोण करतं यावरही बरचसं अवलंबून असतं. म्हणजे मी केलेली भाजी फार वाईट झाली होती असं नव्हे.. पण चांगली झाली होती. तरीही ती बाऊल भर उरलीच. मग त्याची थालीपीठं कशी करणार.मग काय माझ्या सुपिक डोक्यात एक एक कल्पना अवतार घेऊ लागल्या. आणि त्यानंतर मी जो काही खाद्यपदार्थ केला.. तो कशाचा होता हे कोणाला सांगून पटलं नसतं इतका बेमालूम भन्नाट झाला होता. तर ही त्याची पा. कृ.
पालक पनीर (उरलेली भाजी)- १ बाऊलबटाटा १ मोठाब्रेड ३-४ स्लाईसआलं- लसूण पेस्टथोडी लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसारअगदी थोडे कॉर्न स्टार्च..थोडि पुदिनाची पाने (नसेल तर स्वाद ची मिंट चटणी)तेल तळण्यासाठी.
प्रथम पालक पनीर कुस्करून घ्यावे. त्यात तो एक बटाटा मायक्रोवेव मध्ये उकडून घेऊन, कुस्करावा( कुकरला शिजवला तर उत्तम). त्यात आलं लसूण पेस्ट घालावी. मीठ थोडे घालावे. ब्रेडचे तुकडे करून मिसळावेत. मिरची पावडर, पुदिना पाने .. सगळं एकत्र करून पीठ मळतो त्याप्रमाणे घट्ट गोळा करून घ्यावा. घट्ट नाही झाले तर कॉर्न स्टार्च घालावे. आणि पेढ्याच्या आकाराचे गोळे बनवून तेलात ब्राऊन रंगावर तळून काढावे. यात पनीर, बटाटा आणि पुदीना यांची एकदम भन्नाट टेस्ट येते.भाजी कोणतीही असली तरी हा प्रयोग करता येईल.तुम्ही काय काय करता उरलेल्या आमटी भाजी चे.. मलाही सांगा.