गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

कंग/कुंग पाओ टोफु..!

मी इथे अमेरीकेमधे आले, तेव्हा सुरवातीला तर स्वयपाकाची वाटच होती.. काही धड जमत नाही, पोटात काही पण ढकलावं लागतंय वगैरे दिवस होते.. तेव्हा मला अमेरीकन फूडचा पण कंटाळा यायचा.. कसलं ते बिना चवी-ढवीचं अन्नं? चिकन आपल्या कडे किती सुंदर प्रकारांनी करतात.. आणि इथे म्हणजे.. जाऊदे.. तर सांगायचा मुद्दा हा, की त्या काळात मी गेले P.F.Chang's Chinese Bistro मधे.. तिथे ही डिश खाल्ली.. 'कंग पाओ चिकन' .. खूप खूप आवडली.. आणि तेव्हापासून मी ती नेहेमीच घ्यायला लागले....
दर वेळेला बाहेर जाऊन खाण्यापेक्षा म्हटलं, घरी ट्राय करावी.. तर सद्ध्या चालू श्रावण.. म्हणून चिकन च्या ऐवजी टोफु घालून करावी असा विचार केला.. आणि बराच सेम पदार्थ तयार झाला! (चिकनला तोड नाही पण) नंतर जालावर शोधताना कळलं, की ही बरीच कॉमन रेसीपी आहे.. तरी मी सद्ध्या तरी ती self invented recipe आहे असं समजून चालले आहे..
मी ही पाककृती खूपच अंदाजाने आणी आयत्या वेळेस केली असल्या मुळे , घरात बर्‍याच गोष्टी नव्हत्या॥ रेड बेल पेप्पर ( सिमला मिरची), किंवा झुकीनी (काकडी सदृश प्रकार) इत्यादी जिन्नस नसल्या मुळे साधी लाल मिरची, आणि काकडी हे बदल केले.. चवीत खूप फरक नाही पडला , पण शक्यतो ते जिन्नस असावेत.. मी इथे माझीच पाककृती देते.. तर ही घ्या कृती...
वेळ : २० मिनिटे।वाढणी : २ जणांसाठी
लागणारे जिन्नस :
१) टोफू (साधारण ३ X ४ इंच साईझचा ॥)२) रेड बेल पेप्पर ( सिमला मिरची)३) झुकीनी ( मी काकडी घेतली आहे।)४) अर्धा कांदा, २ कांद्याच्या पाती५) १ गाजर६) मुठभर भाजलेले दाणे७) कंग पाओ सॉस ( विकत मिळतो.. तसेच घरी तयार ही करता येतो..)८) मीठ व साखर..९) ऑलीव्ह ऑईल ( नसेल तर कुठलेही)
कृती :
१) प्रथम टोफू पिळून त्यातील पाणी काढून टाकणे. व लहान चौकोनी तुकडे करणे.२) २ चमचे ऑलीव्ह तेलात फ्राय करणे.. थोडा ब्राऊनीश रंग आला की काढून बाजूला ठेवणे.३) कांदा,गाजर्,झुकीनी इ. बारीक चिरून घेणे.४) २ चमचे तेलात कांदा,पातीचा कांदा फ्राय करणे.. त्यातच गाजर पण घालावे..५) कांदा जरा वेळ परतला गेला की झुकीनी/काकडी घालणे. काकडी लगेच शिजते, त्यामुळे सगळ्यात शेवटी घालणे.६) सगळ्या भाज्या परतल्या गेल्या, की त्यात फ्राय केलेले टोफू व भाजलेले दाणे घालणे.७) २ चमचे कंग पाओ सॉस, व अगदी थोडा सॉय सॉस घालणे.८) चिमूटभर मीठ वर १ते २ चमचे साखर घालून हलवणे.९) सगळं एकसारखं झालं की साधा भात/फ्राईड राईस/नुडल्स बरोबर सर्व्ह करणे..