गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

दाल बाटी व दाल बाफले

चतुरंगजींच्या विनंतीस मान देउन हे लेखन वेगळे देत आहे.
परवा गावी (इंदूरला) लग्न कार्यासाठि जाउन आलो.लग्नात खास माळवी बेत होता, दाल बाफल्यांचा.
दाल बाटी आणि दाल बाफल्यांमध्ये, दाल ही सामायीक आहे.ही दाल पातळ अथवा फार घट्ट नसते, ती मध्यम असते. दाल ही तुर अथवा चण्याची असते. दालच्या जागी रतलामी शेवेची कांदा -टोमॅटो घातलेलि भाजी सुध्धा अप्रतीम लागते.
बाटी आणि बाफल्यातला फरक पुढील प्रमाणे:
बाटी:माळवी गव्हाचे (अथवा उच्च प्रतीच्या गव्हाचे) पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन, ते गोवर्‍यांवर मंद पणे भाजले की बाटी तयार होते.
ही बाटी डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. साजुक तुपात कुस्करताना काही लोक डाळि ऐवजी पीठी साखर ही मिसळतात.
बाफले:माळवी गव्हाचे पीठ आणि त्यात थोडे मक्याचे पीठ मिसळून घट्ट कणिक मळावी. मळताना साजुक तुपाचे भरपूर मोहन घालावे. ह्या कणकेचे मुठी एवढे गोळे करुन ते पाण्यात उकळावेत. भरपूर उकळल्यावर ते पाण्यावर तरंगू लागतात.ते तरंगू लागले की ते काढुन कोरडे करावेत. कोरडे झाल्यावर गोवर्‍यांवर मंदपणे भाजावेत.
हे बाफले बाटी प्रमाणे डाळीत अथवा साजुक तुपात कुस्करुन खातात. वरिल प्रमाणे साजुक तुप आणि पीठी साखरेत कुस्करुन बाफले खाणारे ही आहेत.
टीपः शहरात गोवरर्‍यांची भट्टी शक्य नसल्यांमुळे, साध्या ओव्हनचा (माइक्रो वेव नव्हे) उपयोग भाजण्यासाठी केला जातो.