गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

साबुदाण्याची खिचडी

जिन्नस
१ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा
दाण्याचे कूट मूठभर, १ छोटा बटाटा
हिरवी मिरची १-२, लाल तिखट पाउण ते १ चमचा
जिरे १ चमचा, साजूक तूप/तेल ५-६ चमचे
मीठ, साखर, चिरलेली कोथिंबीर २-३ चमचे
खवलेला ओला नारळ २-३ चमचे
मार्गदर्शन
साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा. थोडेसे पाणी राहू द्या म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून पाण्यामध्ये घाला. मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेला बटाटा घाला व परता. बटाटा घालताना त्यातले पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओला नारळ घालून परत परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व दाण्याचे कूट घालून चांगले ढवळून घ्या. व हे ढवळलेले मिश्रण कढईत घालून सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकण ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.
साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा. खिचडी सर्वात चविष्ट साजूक तूपातील होते.