गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

केळ्याची पकोडे - रस्सा भाजी(केले की गोली )

जिन्नस
२ कच्ची हिरवी केळी
३ मध्यम कांदे
३ मध्यम बटाटे
२ टोमॅटो
हळद
तिखट
गरम मसाला
राई
हिंग
जिरे
मार्गदर्शन
पकोडेः
२ कच्ची केळी, १ बटाटा व १ कांदा कूकर मध्ये वाफवून घ्या. थोडे थंड झाले की केळी, बटाटा व कांदा सोलून एकत्र मळून घ्या. यात थोडे राईचे तेल (अंदाजे १ -२ चमचे), १/२ चमचा हळद, १/२ चमचा तिखट, १/२ चमचा गरम मसाला, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ हिरवी मिरची बारीक चिरून, धणे-जिरे पूड आणि चवीप्रमाणे मीठ घाला. हे मिश्रण चांगले मळून घ्या. गरजेप्रमाणे बेसन घाला. या मिश्रणाचे ८-१० गोळे करून घ्या. ( या साठी मिश्रण एकदम घट्ट नको किंवा सैल ही नको).
कढई मध्ये रिफाईंन्ड तेल चांगले तापवा. यात वरील गोळे खरपूस तळून घ्या. थोडे थंड होऊ द्या.
रस्सा :
प्रथम २ बटाटे नेहेमीप्रमाणे चिरून रिफईंड तेलात छान तळसावून घ्या. आता यातच हिंग-मोहोरी-जिरे फोडणी करून त्यात १-२ हिरव्या मिरच्या व आले-लसूण पेस्ट घाला. यात मध्यम चिरलेले कांदे घाला. चांगले परतून घ्या. यात टोमॅटो चिरून घाला. एकत्र होईपर्यंत परतून घ्या.
१/२ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा गरम मसाला, धणे-जिरे पूड व चवीपुरते मीठ घाला. खमंग सुवास येईपर्यंत परतून घ्या.
आता पाणी घाला. हा रस्सा जरा पातळच असू द्या.
रश्श्यातील बटाटे शिजले की त्यात केळ्याचे पकोडे घाला. चांगले उकळू द्या. पकोडे रश्श्यात बुडून छान फुलले पाहिजेत नाहीतर मजा नाही.
हश्श्श....
आता ही पकोडे भाजी आवडी प्रमाणे चपाती / भाकरी / भाता बरोबर खायला तयार आहे!
टीपा
१. पकोड्याचे गोळे गरजेप्रमाणे कमी-जास्त होऊ शकतात.
२. केळ्याचे पकोडे रश्शाशिवाय ही छान लागतात, हिरवी चटणी किंवा सॉस बरोबर!
३. आवडत असेल तर पकोड्यात कोथिंबीर घाला, थोडी वेगळी चव येते.