गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

...उर्फ सुगरणीचा सल्ला ४

परवा हापिसात नशिबाला पुजलेली इडली गिळताना नेमकी एका मराठमोळ्या सुबक ठेंगणीशी गाठ पडली. 'काय, कसं काय'वर न भागता तिचा पाकशाळेत स्वहस्ते रांधलेला डबाही दृष्टीस पडला.
अंमळ असूयेनंच मी कसंबसं म्हटलं, "वा, साबुदाण्याची खिचडी कशी काय?"
'मला साबुदाणा भिजवायचं वेळच्या वेळी आठवतं, जमतं. माझ्याकडे दाण्याचं कूटपण असतं,' असलं काहीतरी प्रामाणिक प्रॅक्टिकल उत्तर द्यावं ना? पण नाही. मस्ती. 'अय्या, तुम्ही उपास नै करत चतुर्थीला?' ऐकावं लागलं.
मग मलापण चेवच चढला. मान्य आहे, असेल बिचारी चतुर्थी-बोडण-चतुर्मास पंथातली, तर उगीच मूर्तिभंजनाचं काही कारण नव्हतं. पण एक तर मला ऑफर न करता खिचडी खातेय आणि वर ही जुर्रत? शी आस्क्ड फॉर इट, यू नो?
हिरवी चटणी भरलेलं पापलेट, बांगड्याचं कालवण, काळ्या मसाल्यातलं चिकन... इथपासून सुरुवात करून मी 'ससापण ट्राय करून पाहिलाय मी, फार नाही वेगळा लागत. मोर खाल्ला होता एकदा चंद्रपूरला गेले होते तेव्हा. तू खाल्लायस?'पर्यंत मजल मारली आणि तिच्या खिचडीचं यथाशक्ती वाट्टोळं केलं.
'खातेय मी, जरा गप बसायला काय घेशील?' हे स्पष्ट छापलं होतं तिच्या थोबाडावर. पण म्हटलं ना, खिचडीच्या बाबतीत मला नडू नये कुणी.
त्या दिवशी घरी आल्यावर पहिलं काय केलं असेल तर साबुदाण्याला जलसमाधी दिली. (साबुदाणा मिळवण्याचं क्वालिफिकेशन = साबुदाणा म्हणजे काय; नायलॉन साबुदाणा, साधा साबुदाणा आणि बारीक साबुदाणा यांतलं साम्य आणि फरक कोणते हे बंगळूरकर दुकानदाराला समजावून सांगण्याचे पेशन्स.) खिचडीत काय करायचं होतं मोठंसं? साबुदाणा भिजवायचा, तूप-जिर्‍याची फोडणी करून त्यात टाकायचा नि वरून दाण्याचं कूट मारायचं. झालं.
संध्याकाळी अ नि ब येऊन खिचडी पाहतील, तेव्हा त्यांना लाळेरं द्यावं लागेल की कसं, यावर थोडा विचार करून मी ताणून दिली.
संध्याकाळ.अ, ब आणि क्ष.कढईला चिकटलेला खिचडीचा लगदा.
"तूप. थोडं तूप घालून गरम कर अजून. म्हंजे मोकळी होईल ती."
"तूप? मी ऑलरेडी काकूंनी आणलेला साजूक तुपाचा डबा संपवलाय. आता उरलेलंही घातलं, तर उद्या वरण-भातावर इथलं पिवळं तूप घ्यावं लागेल. घालू?"
"न-नको."
"जिरं अजून तडतडायला हवं होतं नै?"
"माझी आई दाण्याचं कूट खूप घालते. आपल्याकडे नैये का?"
"आयडिया, आपण यात बटाटा घालून थालिपिठं लावू या याची?"
"पण अजून तूप लागेल त्याला."
"नाही, मग - हे वाईट नाही लागतेय तसं..."
"दही आहे आपल्याकडे? आणतेस प्लीज?"
खरं सांगायचं तर खिचडी तशी सुरेखच झाली होती. अ, ब नि क्षच्या अंगात नाटकंच जास्त.
पण मग आई-बाबा आले, तेव्हा मी ठेवणीतला आवाज काढून 'बॉबॉ, खिचडी नै खाल्लीय खूप दिवसांत...' असं एक वाक्य योग्य मौका पाहून हवेवर सोडून दिलं.
(नाही, त्याचं काय्ये, आमच्या आईची खिचडी काही फार सुरेख नाही होत. म्हंजे, तिला आपलं असं वाटतं, की साबुदाणा मऊ नि मोकळा भिजला, की खिचडी आपल्याला जमलीच. पण दुर्दैवानं तसं नसतं ना? तिच्या हातून धड मीठ-साखर नाही पडत. शिवाय दाण्याच्या कुटाचे मोठ्ठाल्ले गोळे होऊन बसतात. ते दाताखाली आले की कसंसंच होतं. याउलट बाबांची खिचडी काय वर्णावी... ते इतक्या मनापासून करतात ना खिचडी, की बास. थोड्या हिरव्या मिरच्या फोडणीत घालायला, हिरवा रंग तसाच राहून खिचडी छान दिसावी म्हणून थोड्या नंतर वरून घालायला, साबुदाण्यातच मिसळून घेतलेलं दाण्याचं कूट, सढळ हस्ते मीठ-साखर, छान ब्राउन करून घेतलेल्या बटाट्याच्या फोडी. 'मिरची भाजून हवीय दह्यात?' असं तर हमखास विचारणार. वाढून घ्यायला गेलं की 'अग अग, एक वाफ निघू दे की...' आणि मग 'घे की आणिक थोडी...' असं असताना आईला कोण भाव देणार?)
तर ते वाक्य रामबाण ठरलं. दुसर्‍या दिवशी खिचडी. क्ष नेमका गावाला गेला होता, त्यामुळे त्याची हुकली. पण अ, ब आणि मी मन लावून खिचडी खाल्ली नि बाबांनी डोळे भरून पाहिलं. मग मी त्यांनी साबुदाणा भिजवायची ट्रिक विचारून घेतली. ती कृती अशी -
रात्री साबुदाणा पाण्यात नीट चोळून चोळून धुऊन घ्यायचा. भांडं कलतं केल्यावर किंचित पाणी दिसेल, इतकंच पाणी त्यात ठेवून बाकीचं ओतून टाकायचं. सकाळी साबुदाणा एकदा हातानी हलवून पाहायचा. फारच कोरडा वाटला, तर पाण्याचा एक हबका मारायचा. त्यात बरचंसं दाण्याचं कूट, मीठ, साखर असं एकत्र कालवून ठेवायचं. मग तुपात जिरं नि हिरव्या मिरच्यांची फोडणी करायची. थोड्या हिरव्या मिरच्या बाजूला ठेवायच्या हे असेलच लक्षात! त्यात बटाट्याच्या फोडी चांगल्या परतून घ्यायच्या. त्या ब्राऊन झाल्या, की वर ते साबुदाण्याचं प्रकरण घालायचं. साखर थोडी जास्तच. नि झाकण ठेवायचं नाही. नाहीतर लगदा झालाच समजायचा. साधारण नेहमीसारखी दिसायला लागली खिचडी, की ताबडतोब खायची. वर लिंबू, कोथिंबीर, नारळ असले सोपस्कार नसले तरी का-ही-ही फरक पडत नाही.
सोबत सायीचं दही आणि माझी फेवरिट भाजलेली मिरची असेल, तर जगात उपास असावेत, हे मी ब्रह्मदेवाच्या बापालाही पटवून देऊ शकते. ग्यारण्टी!