गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

साखरभात...

राम राम मंडळी,
आज कोली बांधवांची नारलीपुनव! मंडळी, कोली बांधवांचे मी मनापासून आभार मानतो कारण खोल दर्यात जाऊन ते आपल्याकरता ताज्या मासळीचा समुद्री मेवा घेऊन येतात. तेव्हा आज नारलीपुनवेच्या निमित्ताने मी समस्त कोली बांधवांना शुभेच्छा देतो!
आपला,तात्या कोळी.
आमी बामन लोकं नॉर्मली या दिवशी नारळीभात करतो. आमची म्हातारी नारळीभात फार सुरेख करते. परंतु आज तिने जरा नेहमीची वहिवाट मोडली आणि नारळीभाताऐवजी साखरभात केला. तोदेखील फार सुंदर झाला होता हे वेगळे सांगायला नकोच. आमची म्हातारी आहेच मुळी सुग्रण आणि त्याचा आम्हाला वाजवी अभिमानही आहे!
असो,
तर मंडळी, आज आम्ही आपल्या सर्वांकरता आमच्या म्हातारीने केलेल्या साखरभाताची पाकृ येथे देत आहोत. हा साखरभात आपण गोड मानून घ्याल अशी आशा आहे!
साखरभात :
पाकृची माहिती : वैदेही अभ्यंकर.शब्दांकन : तात्या अभ्यंकर.
साहित्य : एक वाटी बासमती तांदुळ, साखर, लवंगा, चारोळी, बदाम, काजू, केशर, वेलची. इत्यादी.
कृती :
प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत. त्यानंतर साजूक तुपाच्या फोडणीवर लवंगा घालून त्यावर तांदूळ घालून चांगला मऊ-मोकळा शिजवून घेणे व एका ताटात पसरून ठेवणे.
त्यानंतर दीड वाटी साखरेचा पक्का पाक करून घ्यावा, पाक तयार होताना त्यात भरपूर केशर घालावे. पाक झाल्यावर त्यात मगासचा ताटात पसरलेला भात घालावा. पाकात भात घातल्यावर ते मिश्रण जरा पात्तळ होते. ते मंद ते मध्यम आचेवर घट्ट होऊ द्यावे. आणि शेवटी त्या भातात वरून काजू, बदाम, वेलची, चारोळी इत्यादी वस्तू ऐपतीप्रमाणे घालाव्यात!
झाला साखरभात तैय्यार!
दुपारच्या टायमाला भरपूर साखरभात हादडून त्यानंतर उन्हं उतरेस्तोवर कुले वर करून मनमुराद झोपावे!
"काका, मला वाचवा.."
आपला,नारायणरावतात्या पेशवा!