गुरुवार, ४ सप्टेंबर, २००८

कांद्याची पातीची पातळ भाजी ?

घरात एकटा मी, रविवारचे दुपारचे १२ वाजत आलेले, कालच्या थोड्याश्या तापाने प्रकृति नरम-गरम, म्हणून बाहेर जाऊन काही खायची किंवा घरात काही कष्टपूर्वक काही मसालेदार करायची हिंमत नाही, तेंव्हा काहीतरी सोपं, पचायला हलकं असं करावं म्हणून भाज्या बघायला फ्रिज उघडलं...आत फक्त कांद्याची लुसलुशीत पात...म्हंटलं चला मुगाच्या डाळीचा तडका देऊन काही करता येतंय का पहावं. तर अशी ही मला नाव माहित नसलेली पाककृती (तुम्हीच द्या नाव पदार्थ आवडला तर) ..साहित्यः १० पातीचे कांदे, १/२ टोमॅटो, पाव वाटी मुगाची डाळ, फोडणीसाठी तेल -मोहरी - हिंग, बारीक चिरलेली अर्धी मिरची, प्रत्येकी अर्धा टी-स्पून धणा-जिरा पावडर आणि मीठवेळः १५ मिनिटे- एकीकडे वाटीभर भात electric cooker मध्ये लावून दिला आणि पातीचे कांदे बारीक चिरले, टोमॅटोच्याही चौकोनी फोडी करून घेतल्या. गरम तेलात फोडणी करून त्यातच मुगाची डाळ आणि चिरलेली अर्धी मिरची घालून परतली. चमचाभर पाणी घालून झाकण ठेवून २ मिनिटे वाफ आणली आणि मग त्यात चिरलेले पात आणि टोमॅटो घालून परतले. मग धणा-जिरा पावडर आणि मीठ घालून एकदा परतून, १/२ कप (अंदाजे १०० ml) पाणी घालुन, झाकण ठेऊन १० मिनिटे शिजवले. तोपर्यंत तयार झालेल्या भातावर ही कांद्याची पातीची पातळ भाजी पसरून खायला मस्त मजा आली. बघा आवडते का ही कृती.