मंगळवार, २९ जून, २०१०

आईस्ड टी (बर्फाळ लिंबू चहा)

साहित्य :

२ ग्लास पाणी
२ टीबॅग्ज/ अर्धा टी-स्पून चहा (कोणताही चालेल - शक्यतो ग्रीन टी वापरतात, नेहमीची चहा पावडर ही ओके. पण फार स्ट्राँग नको)
४ टीस्पून साखर
२ टीस्पून लिंबाचा रस (गाळून)
४-५ पुदिना पाने
बर्फाचा चुरा/ क्यूब्ज

सजावटीसाठी :

लिंबाच्या आडव्या गोल चकत्या, पुदिना पाने.
कृती :

पाण्यात साखर, पुदिना पाने घालून पाणी उकळावे. उकळी आल्यावर चहा घालून लगेच गॅस बंद करावा व चहाचे पातेले झाकावे. ३-४ मिनिटांनी झाकण दूर करून तो चहा दुसर्‍या भांड्यात गाळून घ्यावा. चहा गार झाल्यावर फ्रीजमध्ये किमान तासभर तरी गार करावा.

सर्व्ह करताना त्यात ताजा लिंबाचा रस घालावा. एका मोठ्या उभट ग्लासमध्ये तळाशी बर्फाचा चुरा/ क्यूब्ज घालून त्यावर हा चहा ओतावा. वर पुदिन्याची पाने घालून सजवावे. ग्लासच्या कडेला लिंबाची चकती खोचावी. गारेगार आईस्ड टी पिण्यासाठी तय्यार!

अधिक टीपा :

ह्यात टी बॅग्ज वापरल्यास पाण्यात साखर विरघळवून ते पाणी, पुदिना असे उकळून, गाळून टी बॅग्जवर ओतावे व १५-२० मिनिटे तसेच ठेवावे. त्यानंतर टी बॅग्ज काढून टाकाव्यात. पुढील कृती वर दिल्याप्रमाणेच!

अनेकजण साखरे ऐवजी मधही वापरतात. पण जर मध वापरणार असाल तर तो आयत्या वेळी घालावा. मध घालून पाणी उकळू नये. एक ग्लासाला साधारण १ ते २ चमचे मध पुरतो.

पुदिन्याची चव आवडत नसल्यास पुदिना वगळूनही हा आईस्ड टी अफलातून लागतो. काहीजण ह्या चहात आलेही घालतात. तसेच काहीजणांना हा चहा वेगवेगळ्या फ्लेवर्सच्या सिरप्सबरोबर मिसळून प्यायला आवडतो. उदा: पीच, लाईम, चेरी इत्यादी.

वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीत ह्या चहाचे स्थान अविभाज्य असून त्याच्या रेसिपीज, पिण्याच्या पध्दती इत्यादींमध्येही बरेच वैविध्य आहे. दुपारी किंवा अन्य वेळी प्यायलाही हे पेय उत्तम असून लिंबाचा रस, पुदिना व चहा ह्या संयोगामुळे ताजेतवाने, थंड करणारे आहे.