मंगळवार, २९ जून, २०१०

अननस-स्ट्रॉबेरी- चॉकलेट सुफलेजिन्नस

* कूल व्हिप - ८ औंस ( फॅट फ्री/ लाईट/ रेग्युलर जे आवडेल ते )
* क्रीम चीज- ८ औंस ( फॅट फ्री /लाइट /रेग्युलर जे आवडेल ते )
* जेलो चे एक पाकीट - स्ट्रॉबेरी-अननस-ऑरेंज-आंबा-चॉकलेट ( ज्या फळाचे सुफले करणार त्याचेच )
* एक मोठी वाटी भरून फळाचे तुकडे ( ज्या फळाचे सुफले करणार ते फळ -शक्यतो टीन मधले घ्यावे )
* आक्रोड-बदामाचे तुकडे / चॉकलेट चिप्स अर्धी वाटी

मार्गदर्शन
काचेच्या भांड्यात ( ज्या भांड्यात सेट करायचे असेल त्यात ) क्रीम चीज व कूल व्हिप घेऊन एकजीव करून घ्यावे. टीन मधली फळे वेगळी काढून ठेवावीत. उरलेला रस (सिरप ) साधारण एक कप भरेल. कमी पडल्यास तितके पाणी मिसळून गरम करावे. ( एक कपापेक्षा जास्त भरल्यास दुसऱ्या कपात काढून ठेवावे. व थंड पाणी मिसळताना यातच भर घालून मिसळावे ) किंचित बुडबुडे आले की लागलीच जेलो ( जिलेटीन ) टाकून संपूर्ण विरघळेपर्यंत ढवळावे. साधारण दोन मिनिटातच विरघळते. गॅसवरून उतरवून त्यात एक कप थंड पाणी घालून ढवळून कोमट (रूम टेंपरेचर ) आले की क्रीम चीज व कूल व्हिपच्या मिश्रणात मिसळावे. वेगळी काढून ठेवलेली फळेही त्यात मिसळून सहा तास फ्रीजमध्ये सेट होण्यास ठेवावे. वाढण्यापूर्वी वरून बदाम-आक्रोडचे तुकडे व ताज्या फळाने सजावट करावी. ताजे फळ नसल्यास टीन मधलेच वापरावे. तसे करावयाचे असल्यास मिश्रणात फळे मिसळण्यापूर्वी थोडी बाजूला काढून ठेवण्यास विसरू नये. वाढताना थंड वाढावे. लहान मुलांची बर्थ डे पार्टी असो की मोठ्यांचे गेट-टू-गेदर असो, सगळ्यांना आवडेल असेच हे सुफले.

टीपा
आपण जे फळ घेणार असू त्याच फ्लेवरचे जेलो घ्यावे. अननस असेल तर अननसाचे, चॉकलेट असेल तर चॉकलेटचे. आपल्याला जर साधे ( प्लेन ) जिलेटीन वापरायचे असेल तरीही चालू शकेल. कृतीत काहीच फरक नाही. ताजी फळेच व साधे जिलेटीन वापरणार असू तर जमल्यास जिलेटीन-जेलो तयार करताना त्या त्या फळाचा रस घ्यावा. यामुळे चव नक्कीच वाढते.सेट होण्यासाठी फ्रीजमध्ये किमान सहा तास ठेवणे आवश्यक आहे. घाई करू नये. संत्री, अननस, स्ट्रॉबेरी, चॉकलेट, पीच, आंबा, इत्यादींचे जास्त चांगले लागते. सजावट करताना चॉकलेट सुफले केल्यास वरून चॉकलेट किसून भुरभुरावे व छोटे तुकडेही वापरावे. अतिशय आकर्षक दिसते. लहान मुलांना खूप आवडते. यात अक्रोड-बदाम घालू नयेत. पूर्णपणे फॅट फ्री बनवता येत असल्याने मनसोक्त खाता येईल. चवीत अजिबात फरक पडत नाही. हमखास यशस्वी , अजिबात न चुकणारे व वेळखाऊ नसलेले सुफले.